पडघा-कल्याण बस सेवा गावाबाहेर
पडघा, ता. १७ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा येथे अनेक वर्षांपासून सुरू असलेली पडघा-कल्याण बस सेवा अचानक येणे बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही बस गावाबाहेर थांबत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना अर्धा किलोमीटर पायपीट करावी लागते. त्यामुळे ही सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पडघा ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पडघा गावातील बसस्थानकावर कल्याण आगाराची बस नियमित येत असल्याने विद्यार्थी, महिला, वृद्ध तसेच नोकरदार प्रवाशांना मोठा दिलासा मिळत होता. मात्र, अलीकडे विविध कारणे देत चालकांनी गावातील बसस्थानकावर बस आणणे बंद करून गावाबाहेर उभी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि चाकरमानी यांना बस पकडण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.
पडघा प्रवेशद्वाराजवळ बस थांबत असल्याने प्रवाशांना भर उन्हात बसची वाट पाहत उभे राहावे लागते. थांब्याजवळ मुंबई-नाशिक महामार्ग असल्याने रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून पडघा बसस्थानकावर येणारी पडघा–कल्याण बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थ योगेश जाधव यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, कल्याण बस स्थानक व्यवस्थापकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
गावातील बसस्थानकावर येणारी बस अचानक बंद करून ती गावाबाहेर थांबवली जात असल्याने विद्यार्थी, महिला, वृद्ध व चाकरमानी यांचे हाल होत आहेत.
- योगेश जाधव, ग्रामस्थ, पडघा
विशेष बैठक
पडघा पोलिस ठाण्यात या संदर्भात सोमवारी बैठक घेण्यात आली होती. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. या वेळी कल्याण बस व्यवस्थापकांनी पडघा बस स्थानकापर्यंत बस सुरू करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, सरपंच सायली पाटील, ग्रामपंचायत अधिकारी भास्कर घुडे, डॉ. संजय पाटील, अशोक शेरेकर, शैलेश बिडवी, दिनेश गंधे, रवी विशे, मयुर गंधे अशोक गायकवाड उपस्थित होते.
पडघा : पडघा-कल्याण बस गावाबाहेर थांबत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

