तुर्भेतील सिबिजी व ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पावरून वाद; स्थानिकांचा विरोध तीव्र
तुर्भेतील सीबीजी व ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पावरून वाद
स्थानिकांचा विरोध तीव्र; पत्राद्वारे रोष व्यक्त
तुर्भे, ता. १७ (बातमीदार) : तुर्भे स्टोअर येथील क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राउंड) परिसरात सीबीजी व ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प नवी मुंबई पालिकेमार्फत प्रस्तावित केला आहे, परंतु यावरून तुर्भे झोपडपट्टी परिसरात वाद निर्माण झाला असून, स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला आहे. विश्वासात न घेता हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याबाबत नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी आयुक्तांना पत्र पाठवून या प्रकल्पाला विरोध नोंदविला आहे.
तुर्भे परिसरात शासनाच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी सर्वेक्षणही सुरू आहे. मात्र, प्रस्तावित सीबीजी व वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामुळे या पुनर्वसन योजनेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या मते, अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठी साधारण ५०० मीटरचा ‘बफर झोन’ ठेवणे बंधनकारक असतो. या प्रकल्पातून उत्सर्जित होणारा धूर, वायू व राखेमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार अशा प्रकल्पांच्या ठराविक अंतरात निवासी बांधकामांना परवानगी दिली जात नाही. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या इमारतींना तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
तसेच, संबंधित झोपडपट्टी भाग ‘बफर झोन’मध्ये आला, तर त्या ठिकाणी एसआरआय प्रकल्प राबविणे कठीण होऊ शकतो. परिणामी, स्थानिक रहिवाशांना पुनर्वसनासाठी इतर ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागू शकते, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
आंदोलनाचा इशारा
प्रकल्पावरून तुर्भे परिसरात संभ्रम आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना प्रकल्पाबाबत स्पष्ट व पारदर्शक माहिती देण्याची मागणी जोर धरत आहे, अन्यथा तुर्भे विभागातील नागरिक एकत्र येत तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला आहे, तर प्रकल्पाची संपूर्ण माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांसमोर मांडण्यात यावी, तसेच त्यांची मते जाणून घेऊनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी सुरेश कुलकर्णी यांनी केली आहे. याबाबत प्रशासन या विषयावर काय भूमिका घेते, याकडे तुर्भे झोपडपट्टी वासियांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

