ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर अनधिकृत वाहन पार्किंग
नागरिक कट्ट्यावर अनधिकृत वाहन पार्किंग
ज्येष्ठांना घ्यावा लागतोय दुभाजकाचा आधार
ठाणे शहर, ता. १७ (बातमीदार) ः कोपरीतील ज्येष्ठ नागरिक विनायक कट्टा अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात सापडला आहे. ठाणे पालिकेकडून लाखो रुपये खर्च करून ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी हा कट्टा बांधण्यात आला आहे, शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून नुकतेच त्याचे ग्रॅनाईट दगडात नूतनीकरण केले आहे. मात्र, त्याचा वापर ज्येष्ठांऐवजी अनधिकृत वाहन पार्किंग करणाऱ्यांना होताना दिसत आहे. परिणामी, बसण्यासाठी कट्टा असतानाही ज्येष्ठांवर रस्त्याच्या दुभाजकावर बसण्याची वेळ आली आहे.
कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसर ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पा टप्पा, विरंगुळा आणि बसण्यासाठी शांत भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे नेहमी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. येथे ज्येष्ठ नागरिकांची संख्या पाहता ठाणे पालिकेकडून परिसरात ज्येष्ठ नागरिक विनायक कट्टा बांधला आहे. यामुळे ज्येष्ठांना चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र, बेशिस्त पार्किंगमुळे बसण्याचा कट्टा असूनही ज्येष्ठांना जीव धोक्यात घालून रस्त्याच्या मधोमध दुभाजकावर बसावे लागत आहे.
कारवाईची मागणी
१ ठिकाणी ‘नो पार्किंग’ झोन जाहीर करून ठाणे महापालिका आणि वाहतूक शाखेने संयुक्त कारवाई करून अनधिकृत पार्किंगला आळा घालावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
२ अष्टविनायक चौकात कट्ट्यासमोर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार वेळोवेळी कारवाई केली जाते. पुढेही अशा नियमबाह्य पार्किंगविरोधात कारवाई सुरूच राहील, असे कोपरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांनी सांगितले.
हा कट्टा ज्येष्ठांना बसण्यासाठी नागरिकांच्या करामधून बांधला आहे. मात्र, त्याचा वापर अनधिकृत वाहने पार्क करणाऱ्या लोकांकडून चुकीच्या कामासाठी केला जात आहे. प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यायला पाहिजे.
- पांडुरंग दळवी, ठाणे पूर्व
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

