सैनिकाच्या पत्नीची जमीन हडपण्यासाठी सापळा
पनवेल, ता. १७ (वार्ताहर) : देशासाठी बलिदान देणाऱ्या एका सैनिकाच्या पत्नीला सरकारने दिलेली जमीन हडपण्यासाठी एका टोळीने केलेल्या बनावटगिरीचा कट पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. या टोळीने नावातील साधर्म्याचा फायदा घेऊन बनावट वारस दाखले आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे सुमारे कोट्यवधींची तब्बल ३८.७० गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करून घेतल्याचे उघडकीस आले आहे. पनवेल शहर पोलिसांनी या टोळीतील १४ जणांविरोधात बनावट कागदपत्राच्या आधारे फसवणूक केल्याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल केला आहे.
रंजन गजानन पाटील (वय ६४) हे धाकटा खांदा येथे राहण्यास असून, त्यांचे काका शंकर पाटील हे भारतीय सैन्य दलात असताना १९५५ पूर्वी एका गोळीबारात ते जखमी झाले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना अपत्य नसल्याने सरकारने त्यांच्या पत्नी (रंजन पाटील यांच्या काकू) सिताबाई शंकर पाटील यांना १९५९ मध्ये धाकटा खांदा (सर्व्हे क्र. ५६१) येथे ३८.७० गुंठे जमीन बहाल केली होती. १९८० मध्ये सिताबाईंच्या मृत्यूनंतर ही जमीन वारसा हक्काने रंजन पाटील व त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात होती.
बेलापूर येथील शहाबाज गावातील संशयितांच्या कुटुंबातही सिताबाई शंकर पाटील नावाच्या एक महिला असून, त्यांचे पती शंकर गणा पाटील यांचा १९६८ मध्ये मृत्यू झाला. या टोळीने नावाच्या साम्याचा चलाखीने वापर करत बेलापूर न्यायालयातून वेगळ्या कारणासाठी वारस दाखला मिळवला. त्यानंतर हा दाखला धाकटा खांदा येथील जमिनीसाठी लागू होतो, असे भासवून त्यांनी पनवेल तलाठी कार्यालयात सादर केला. तसेच मूळ वारस जिवंत असतानाही, महसूल विभागाची दिशाभूल करून या टोळीने मृत सैनिक पाटील यांच्या जमिनीच्या सातबारावर स्वत:ची १४ नावे लावून घेतली.
मोजणी आणि नोटीसमुळे फुटले भांडे
रंजन पाटील व त्यांच्या कुटुंबाने २०१९ मध्ये या जमिनीची अधिकृत मोजणी केली होती व सर्व कर भरले होते. मात्र, २०२३ मध्ये जेव्हा उपविभागीय अधिकारी कार्यालयातून त्यांना एक नोटीस आली, त्यानंतर त्यांच्या जमिनीच्या सातबारावर दुसऱ्याच १४ जणांची नावे चढवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पाटील यांनी या प्रकरणाशी कागदपत्रे मिळवल्यानंतर संशयितांनी बनावट वारस दाखल्याच्या आधारे हा जमीन पूर्णपणे हडपण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पाटील यांनी पनवेलमधील समाजसेवक अस्लम मुन्शी यांच्या मदतीने न्यायालयात धाव घेतल्यानंतर पनवेल येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पनवेल शहर पोलिसांना दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

