तलासरीत बस थांबे मोडकळीस; उन्हात प्रवाशांची होरपळ, तातडीने दुरुस्तीची मागणी

तलासरीत बस थांबे मोडकळीस; उन्हात प्रवाशांची होरपळ, तातडीने दुरुस्तीची मागणी

Published on

तलासरीत बस थांबे मोडकळीस; उन्हात प्रवाशांची होरपळ
तातडीने दुरुस्तीची मागणी

तलासरी, ता. १७ (बातमीदार) : तलासरी तालुक्यातील महामार्गालगत तसेच खेडोपाडी गावांमध्ये उभारण्यात आलेले बस थांबे सध्या पूर्णपणे मोडकळीस अवस्थेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या बस थांब्यांकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
सध्या उन्हाळ्याचा कडाका वाढला असून, तापमानाचा पारा उच्चांक गाठत आहे. अशा परिस्थितीत प्रवासी बसची वाट पाहण्यासाठी बस थांब्यांचा आधार घेतात. मात्र, बहुतांश ठिकाणी बस थांब्यांवरील छपरे, पत्रे तुटलेली किंवा अर्धवट अवस्थेत असल्याने प्रवाशांना उन्हातच उभे राहावे लागत आहे. परिणामी, उष्माघात, उलट्या यासारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढला आहे. विशेषतः महामार्गालगत असलेल्या बस थांब्यांची स्थिती अधिकच बिकट असून, काही ठिकाणी छपरे पूर्णपणे कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. बस थांब्यांचा आसरा घेण्याऐवजी प्रवाशांना उन्हाच्या तडाख्यात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
याकडे संबंधित विभागांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. बस महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी याची दखल घेऊन अशा जीर्ण अवस्थेतील बस थांब्यांची तातडीने दुरुस्ती करावी किंवा नवीन बस थांबे उभारावेत, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
------------------
सध्या उन्हाळा सुरू असल्याने तापमानात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. अशा वेळी प्रवासी बस थांब्यांचा आधार घेतात. मात्र, तलासरी महामार्गालगत व इतर भागातील बस थांब्यांची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर बस महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तातडीने लक्ष घालून ही गैरसोय दूर करावी.
- अश्रफ खान, शिवसेना (ठाकरे गट) उपतालुका प्रमुख.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com