कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थ हैराण
कचरा प्रकल्पाच्या दुर्गंधीने ग्रामस्थ हैराण
प्रकल्प बंद करण्याची तहसीलदारांकडे मागणी
कल्याण, ता. १७ (बातमीदार) ः श्री मलंगगड विभागातील शेलारपाडा येथील खासगी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातून सुटणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थ मंडळ शेलारपाडाच्या वतीने अंबरनाथ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, हा प्रकल्प तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रकल्पामधून २४ तास सुटणाऱ्या दुर्गंधीमुळे शेलारपाडा परिसरात राहणे कठीण झाले आहे. ग्रामस्थांच्या मते, या दुर्गंधीमुळे श्वसनाचे विकार, डोकेदुखी आणि उलट्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर याचे अत्यंत विपरीत परिणाम होत असून काही बालकांना गंभीर आजारामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव
दुर्गंधीसोबतच या कचरा प्रकल्पामुळे परिसरात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कचऱ्याच्या शोधात येणारे हे श्वान हिंसक बनत असून गावात नागरिकांचा चावा घेण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
तहसीलदारांकडून पाहणी
ग्रामस्थांच्या तीव्र संतापानंतर तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या समस्येवर लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे; मात्र तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
दुर्गंधीने आमचा श्वास तर कोंडलाच आहे; पण प्रकल्पाजवळ असलेल्या श्वानाने माझ्या मुलाच्या गालाचा चावा घेतला. या भागात आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने उपचारासाठी आम्हाला लांब धावपळ करावी लागते.
- प्रदीप दाभणे (रहिवासी, शेलारपाडा)
माझ्या मुलाला न्यूमोनिया झाला, तर मुलगी पाच दिवस आयसीयूमध्ये होती. ती मरणाच्या दारातून परत आली आहे. शाळा आणि वस्तीजवळ असे प्रकल्प राबवणे कितपत योग्य आहे?
- सुनील वारे (रहिवासी, शेलारपाडा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

