महिलांनी नव्या क्षेत्रात उतरावे : दरेकर
महिलांनी नव्या क्षेत्रात उतरावे : दरेकर
मुंबई बँकेत महिला दिन कार्यक्रम; ५०० महिलांना टॅक्सी परवान्यांची घोषणा
मुंबई, ता. १७ ः महिलांनी आपल्या दैनंदिन कामकाजातून बाहेर येऊन कामे करावीत, कामाची नवनवीन क्षेत्रे शोधावीत, असे मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी नुकतेच मुंबई बँकेत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमात सांगितले.
याप्रसंगी मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, संचालिका जयश्री पांचाळ, कविता देशमुख, संचालक आनंदराव गोळे, नितीन बनकर, बँकेचे कार्यकारी संचालक डी. एस. कदम, मुख्य सरव्यवस्थापक संदीप सुर्वे यांसह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
या वेळी दरेकर म्हणाले, की महाराष्ट्रातही अनेक महिलांनी आपापल्या जिल्ह्यात, आदिवासी पाड्यात, उद्योग-व्यवसायात, शिक्षण क्षेत्रात अतिशय प्रामाणिकपणे काम केले आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या उक्तीनुसार तुम्ही आता स्वतःहून पुढे आले पाहिजे. तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र विस्तारले पाहिजे. यासाठी जी आर्थिक मदत, आर्थिक सहाय्य लागेल त्यासाठी राज्य सरकार किंवा मुंबई जिल्हा बँक आपल्या पाठीशी उभी राहील. सरकारच्या शासकीय योजना जोडून देण्याचा प्रयत्न करू. यासाठी महिलांनी आपल्या दैनंदिन कामकाजातून बाहेर येऊन काम करण्याची गरज आहे. कामाची नवनवीन क्षेत्रे शोधली पाहिजेत. बँकर्स म्हणून जी मदत लागेल ती निश्चितपणे करू. महिला-बालकल्याणचे विषय, शिक्षण विभागाशी संबंधित विषय असतील त्याचेही निवेदन मला द्या. अधिवेशन काळात संयुक्त बैठक घेऊ आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला.
५०० महिलांना टॅक्सीचे परवाने देऊ
दरेकर म्हणाले, की राज्य सरकारने नवीन टॅक्सीचे सर्व परवाने रद्द केले आहेत. देवदत्त टुरिझम सहकारी संस्थेला दोन हजार परवाने द्यावेत, असे मी परिवहन मंत्री व मुख्यमंत्री यांना सांगितले. त्यांनी ते देण्याचे मान्य केले आहे. तुम्ही ५०० महिला आणा. त्या महिलांना टॅक्सी देऊ. त्यांना एक महिन्याचे प्रशिक्षण देऊ. संपूर्ण महामुंबई विभागात दोन हजार परवाने घेत आहोत. त्यातील ५०० परवाने महिलांसाठी देऊ. त्यासाठी महिलांनी पुढे येण्याची गरज आहे. महिला पुढे आल्या पाहिजेत अशा प्रकारची भूमिका घेऊन येणाऱ्या काळात काम करावे, अशी अपेक्षा दरेकरांनी व्यक्त केली.

