ठाणे महापालिका महासभेत २६५ विषय
ठाणे महापालिका महासभेत २६५ विषय
प्रश्नोत्तराचा तास आणि लक्षवेधी पुन्हा नाकारली; लोकप्रतिनिधींमध्ये असंतोष
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ठाणे पालिकेच्या प्रशासकीय राजवटीनंतर पार पडणाऱ्या सर्वसाधारण सभेत तब्बल २६५ विषय मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यापैकी १७० विषय स्थायी समितीशी संबंधित असल्याने या मुद्द्यांवरून मोठा गदारोळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रस्तावांवर चर्चा करण्याची मागणी केली जात असताना, प्रश्नोत्तराचा तास आणि लक्षवेधी सूचना न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची दाट शक्यता आहे.
जानेवारी महिन्यात पार पडलेल्या महापालिका निवडणुकीनंतर ३ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा झाली होती. यात शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी, तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली. त्यानंतर विविध पदांच्या निवडी पूर्ण झाल्या असल्या तरी, नियमित महासभा अद्याप झाली नव्हती. बुधवारी (ता. १८) होणाऱ्या महासभेत रुग्णवाहिका सुविधा, भटके श्वान निवारा, पादचारी पूल, माहिती तंत्रज्ञान सेवा व्यवस्थापन आदी विविध विकासकामांचे प्रस्ताव मांडले जाणार आहेत.
प्रश्नोत्तराचा तास रद्द केल्याने संताप
गटनेत्यांच्या बैठकीत या वेळीही प्रश्नोत्तराचा तास आणि लक्षवेधी सूचना न घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. मागील सभेतही असाच निर्णय झाल्याने भाजपासह विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सभा उधळून लावली होती. आता पुन्हा तोच कित्ता गिरवला गेल्याने लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी असून, त्याचे पडसाद महासभेत उमटण्याची चिन्हे आहेत.
नगरसेवकांचे १६ प्रस्ताव
विविध प्रभागांतील विकासकामांसाठी नगरसेवकांनी १६ सूचना प्रस्ताव मांडले आहेत
दिवा परिसर: अनधिकृत शाळांवर कारवाई आणि रेल्वे स्थानकाजवळील तलाव सुशोभीकरण, रस्ते काँक्रीटीकरण आणि जलवाहिन्या टाकणे
परिवहन: आगारांचे आरक्षण विकसित करणे.
आरोग्य: नवीन रुग्णालय उभारणी आणि अभय योजना लागू करणे.
सुविधा: खारीगाव-पारसिकनगर येथे बाजारपेठ व वाहनतळ उभारणी.
अभय योजना लागू करणे
सभेचे गणित
एकूण विषय: २६५
मूळ महासभा प्रस्ताव: ९०
स्थायी समितीशी संबंधित प्रस्ताव: १७०
नगरसेवकांचे वैयक्तिक प्रस्ताव: १६

