अर्थसंकल्पात १०२ कोटींची वाढ
भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने सुमारे १०२ कोटींची वाढ केली आहे. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यावर भर देत स्थायी समितीने ही वाढ केली आहे.
आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी महापालिकेचा १,४३९ कोटींचा अर्थसंकल्प गेल्या आठवड्यात स्थायी समितीकडे सादर केला होता. या अर्थसंकल्पावर समितीच्या बैठकीत चर्चा होऊन त्यात १०२ कोटींची वाढ झाली आहे. आता या अर्थसंकल्पाला महासभेत अंतिम स्वरूप मिळणार आहे. प्रशासनाने अर्थसंकल्पात दिलेल्या मालमत्ता कर, विकास कर, पे ॲण्ड पार्क, जाहिरात याद्वारे मिळणाऱ्या उत्पनाच्या आकडेवारीत स्थायी समितीने वाढ केली आहे.
एप्रिलपासून नव्याने होणारी कर आकारणी वाढीव दराने करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे, मात्र या निर्णयाचा समावेश आयुक्तांनी अर्थसंकल्पात केला नव्हता. स्थायी समितीने नवी कर आकारणी वाढीव दरानेच होणार असल्याचे स्पष्ट करून त्यानुसार करायच्या वसुलीत वाढ होणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या आर्थिक वर्षात सुमारे दोन हजार सदनिकांना कर आकारणी झाली होती. आगामी आर्थिक वर्षात अडीच ते तीन हजार घरांना वाढीव दराने कर आकारणी होऊन मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ होईल, असे स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत यांनी सांगितले.
उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न
नव्या इमारतींच्या बांधकामाला परवानगी देताना महापालिकेच्या नगररचना विभागाकडून विकसकाला विकास कर आकाराला जातो. महापालिकेकडे आलेल्या बांधकाम परवानगीच्या प्रस्तावांची संख्या पहाता प्रशासनाने विकास करापोटी गृहीत धरलेली रक्कम कमी असून त्यापेक्षा जास्त रक्कम महापालिकेकडे जमा होणार आहे. याशिवाय आगामी काळात शहरात मेट्रो सुरू होणार असल्याने मेट्रो मार्गाखाली पे ॲण्ड पार्क सुरू करून त्यातून उत्पन्न मिळणार आहे. जाहिरातीद्वारे मिळणारे उत्पन्नही प्रशासनाकडून कमी दाखविण्यात आले आहे, असे गेहलोत यांचे म्हणणे आहे. या सर्वांचा विचार करता महापालिकेने अर्थसंकल्पात दाखविलेल्या उत्पन्नाच्या आकडेवारीपेक्षा किमान १०२ कोटींनी महापालिकेचे उत्पन्न वाढू शकणार असल्याने स्थायी समितीने अर्थसंकल्पात तेवढी वाढ केल्याचे गेहलोत यांनी सांगितले.
सुविधांसाठी तरतूद
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवे अग्निशमन केंद्रे व अग्निशमन वाहन खरेदी, मीरा रोड येथील कर्करोग रुग्णालय, पर्यावरण रक्षणासाठी तिवरांची लागवड, महिलांसाठी विविध योजना राबवता याव्यात, यासाठी महिला भवन, पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यासाठी पशूचिकित्सालय व निवारा केंद्र, सर्वसामान्यांवर उपचारासाठी आयुष्यमान आरोग्य मंदिर, डिजिटल शाळा, दिव्यांगांसाठी प्रशिक्षण, शिक्षण व उपचार आदींसाठी स्थायी समितीने अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद केली असल्याची माहिती गेहलोत यांनी दिली.
सेल्फी पॉइंटवर बंदी
स्थायी समितीने प्रभाग समिती निधीतही वाढ केली आहे, मात्र त्याचबरोबर नगरसेवक निधीतून होणाऱ्या वायफळ खर्चावरदेखील आळा घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात नगरसेवक निधीतून अनेक ठिकाणी सेल्फी पॉइंट बांधण्यात आले आहेत. त्यावर लाखो रुपये खर्च झाले असून सध्या सर्व सेल्फी पॉइंटची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे यापुढे सेल्फी पॉइंटसारख्या कामांवर वायफळ खर्च केला जाणार नाही, असा निर्णय स्थायी समितीने घेतल्याची माहिती गेहलोत यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

