नारीशक्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
‘नारीशक्ती सन्मान’ सोहळा उत्साहात
ठाणे, ता. १७ ः ब्राह्मण शिक्षण मंडळ संचलित ब्राह्मण विद्यालय व पूर्व प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त ‘नारीशक्ती सन्मान सोहळा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मंडळाच्या अध्यक्षा नमिता सोमण व चिटणीस ॲड. केदार जोशी यांच्या मार्गदर्शन व शुभेच्छांमुळे कार्यक्रमाला विशेष उंची लाभली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना चव्हाण व पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सारिका दामले यांच्या नियोजनातून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका प्रतिभा मढवी व यशोदा फाउंडेशनच्या शोभा मोरे उपस्थित होत्या. अध्यक्षीय भाषणात पेंडसे यांनी स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित करत प्रेरणादायी विचार मांडले. तसेच प्रमुख पाहुण्या शोभा मोरे यांनी विद्यार्थी व पालकांसाठी विविध बक्षिसांची घोषणा करत उपस्थितांना सुंदर मार्गदर्शन केले. पौरोहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या चारुशीला देवळालीकर यांनीही आपल्या प्रबोधनातून स्त्रीशक्तीचा जागर केला.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पौरोहित्य चारुशीला देवळालीकर, पोलिस गीतांजली राठोड व श्रद्धा जाधव, ब्युटीशियन निशा फुलसुंदर, वकील रुपाली पेठकर, फुल व्यवसाय अनिता म्हात्रे, हॉस्पिटल आया ताराबाई रेणोसे, समाजसेविका रोशनी पाटील व निशिगंधा हिवरकर (नर्स) यांचा मान्यवरांच्या हस्ते नारीशक्ती सन्मान देऊन गौरव केला. कार्यक्रमाची सुरुवात ईश्वर स्तवन व स्वागतगीताने झाली. हे सुमधुर सादरीकरण विद्यालयातील शिक्षिका शालिनी जोशी व जसिंता पराड यांनी केले. पालकांसाठी आयोजित रांगोळी व पाककला स्पर्धांमधील विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पालकांनी सादर केलेले ‘आदिशक्ती’ हे सादरीकरण कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शिक्षिका किशोरी दाभोळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैशाली भागवत यांनी केले. शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला आणि ‘वंदे मातरम्’च्या गजरात कार्यक्रमाची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

