पाणी प्रश्नांवर बोलू न दिल्याने विरोधक आक्रमक
पाणीप्रश्नावरून रणकंदन
महापालिकेत बोलू न दिल्याने विरोधक आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : कडक उन्हात कमी दाबाने आणि दूषित पाणीपुरवठ्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. महापालिकेकडून अडीच हजार रुपयांत पाणी विकत घेत टँकरमाफिया १० हजार रुपयांत पाणी विकतात, टँकरमाफिया आणि पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांचे संगनमत आहे, असा आरोप मंगळवारी (ता. १७) पालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी केला.
नगरसेवक रितेश राय यांनी ‘६६ ब’अंतर्गत पाण्याचा मुद्दा उपस्थित केला, याच वेळी सभागृहात पाणीप्रश्नावर बोलू न दिल्याने काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. पाणीप्रश्नावर २० हून अधिक सदस्य बोलणारे असून अर्ध्या तासाची वेळ असताना एक तास १० मिनिटे चर्चा झाली, त्यामुळे आता गटनेते बोलतील, असे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची अपेक्षित न उत्तर मिळाल्याने याचा आढावा घेऊन उत्तर द्यावे, अशी सूचना महापौर रितू तावडे यांनी या वेळी केली.
पाणीप्रश्न हा एखाद्या प्रभागासाठी मर्यादित नसून संपूर्ण मुंबईचा प्रश्न आहे. दूषित पाणी, पाणी वेळेत न येणे हे नियमित झाले आहे, गोरेगाव आरे कॉलनीत आदिवासी पाड्यातील लोक आठवड्यातून एकदा अंघोळ करतात, त्यामुळे पाणीप्रश्न किती गंभीर आहे, असे ‘एमआयएम’चे गटनेते विजय उबाळे म्हणाले. तर वर्षानुवर्षे पाण्यावर चर्चा होत असते, पाइपलाइन फुटली तर संपूर्ण विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. जलवाहिनी फुटली तर कुठे फुटली, याचा नकाशा जल विभागाकडे नाही, टँकरमाफिया बोगस पावत्या बनवतात आणि जादा दराने पाणी विकतात, टँकरमाफियांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी प्रवीण छेडा यांनी केली.
अधिकाऱ्यांचे निलंबन करा!
‘एसटीपी’ (मलनिस्सारण प्रक्रिया) प्रकल्प उभारला जात आहे, या माध्यमातून १,२०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त हे पाणी उपलब्ध होईल; परंतु रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचे काय झाले, असा सवाल विशाखा राऊत यांनी उपस्थित केला. यामिनी जाधव, स्वप्ना म्हात्रे, वखार खान, धर्मेश गिरी, प्रकाश दरेकर, आश्रफ आजमी, संध्या दोशी, प्रिती सातम, रोशन शेख, मीनाक्षी पाटणकर, डॉ. सईदा खान आदी सदस्यांनी पाणीप्रश्न मांडला. दरम्यान, पाणीचोरी रोखण्यासाठी पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांचे निलंबन करा, अशी मागणी सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली.
गळती शोधण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा शोध
भविष्यात पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करणे गरजेचे असून समुद्राचे खारे पाणी गोडे केल्यास अधिकचे पाणी उपलब्ध होईल. मनोरी येथील समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याबाबत कार्य आदेश देण्यात आले आहेत. या सगळ्याला काही कालावधी लागेल. जुन्या जलवाहिनी, गळती यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो, पाणी गळतीचा शोध घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेतला जात आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले. टँकर पद्धतीत काही बदल करता येईल का, याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

