पाणीपट्टी थकबाकीदारांवर ठाणे महापालिकेचा ‘धडाका’

पाणीपट्टी थकबाकीदारांवर ठाणे महापालिकेचा ‘धडाका’

Published on

पाणीपट्टी थकबाकीदारांवर ठाणे महापालिकेचा धडाका
सहा दिवसांत ५३३ नळजोडण्या खंडित; ७१७ जणांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ठाणे महापालिकेने पाणीपट्टी थकबाकीदारांविरोधात कठोर पावले उचलत कारवाईचा धडाका लावला आहे. अवघ्या १ ते १६ मार्चदरम्यान ५३३ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असून, ७१७ थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या आक्रमक मोहिमेमुळे पालिकेने १४ कोटी ८८ लाख रुपयांची वसुली केली आहे.
पाणीपट्टीवरील व्याज, दंड आणि प्रशासकीय शुल्कावर १०० टक्के सवलत देऊनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेने थेट कारवाईचा मार्ग स्वीकारला. दिवा परिसरात सर्वाधिक २०२ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या. याशिवाय २८ पंप जप्त करून १४ पंपरूम सील करण्यात आल्या. कळवा प्रभागात १५५, लोकमान्य-सावरकरनगरमध्ये ६३, तर नौपाडा-कोपरीत ८२ नळजोडण्या तोडण्यात आल्या. उथळसर आणि वर्तकनगर भागातही कारवाई झाली आहे.
वसुलीत माजिवडा-मानपाडा प्रभाग ४.३६ कोटींसह अव्वल ठरला असून, त्यापाठोपाठ कळवा, वर्तकनगर, नौपाडा-कोपरी आणि उथळसर प्रभागांचा क्रम लागतो. महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना ३१ मार्चपूर्वी थकबाकी भरून सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा १ एप्रिलपासून अधिक कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com