पश्चिम रेल्वेच्या १६ लोकल आता १५ डब्यांच्या; प्रवाशांना गर्दीतून दिलासा
‘पश्चिम’च्या १६ लोकल गुरुवारपासून १५ डब्यांच्या!
मुंबई, ता. १७ : प्रवाशांची वाढती संख्या आणि गर्दीचा ताण लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या १६ उपनगरीय लोकलचे १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुधारणा १९ मार्च २०२६ पासून लागू होणार असून, त्यामुळे लोकलची वहन क्षमता वाढणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बदलानंतर १५ डब्यांच्या लोकलची एकूण संख्या २११ वरून २२७ इतकी होणार आहे; मात्र उपनगरीय लोकल सेवांची एकूण संख्या १,४१४ इतकीच कायम ठेवण्यात येणार असून, फक्त डब्यांची संख्या वाढवून प्रवासी क्षमता वाढविण्यात येत आहे. रूपांतर करण्यात येणाऱ्या १६ सेवांपैकी आठ सेवा गर्दीच्या वेळेत धावणार आहेत. त्यामुळे नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना याचा थेट फायदा होणार आहे.

