ठाण्यात साकारली ९० फूट महारांगोळी
ठाण्यात साकारली ९० फूट महारांगोळी
ठाणे, ता. १७ : ठाण्यातील गावदेवी मैदान येथे संस्कार भारतीच्या वतीने ९० बाय ९० फूट भव्य महारांगोळी साकारत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या प्रवासाचे प्रभावी चित्रण करण्यात आले. ३५ कलाकारांनी एकत्र येत भारत माता, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे चित्र आणि देशभक्तीपर संदेश रेखाटले.
श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या गुढीपाडवा स्वागतयात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक उपक्रम आणि प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. संविधानाच्या ७५ वर्षांनिमित्त विशेष चित्रप्रदर्शन, तसेच ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. गेल्या २५ वर्षांची परंपरा जपत आयोजित या उपक्रमांना ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी नव्या विषयावर आधारित महारांगोळी साकारली जाते आणि त्यातून सामाजिक व सांस्कृतिक संदेश दिला जातो. याचबरोबर मैदानात विविध विषयांवर आकर्षक प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे.

