किरकोळ तफावतीमुळे भरपाईचा दावा नाकारणे चुकीचे
किरकोळ तफावतीवरून भरपाईचा दावा नाकारणे चुकीचे
रेल्वे अपघातप्रकरणी उच्च न्यायालयाचे निरीक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : अन्य पुराव्यांवरून प्रवाशाची ओळख पटत असेल, तर केवळ सीझन तिकिटावरील त्याच्या नावामध्ये किरकोळ तफावत आढळल्याने रेल्वे अपघातातील नुकसानभरपाईचा दावा फेटाळणे योग्य नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने नुकताच दिला.
याचिकाकर्त्यांचे अपील योग्य ठरवताना न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने त्यांना दिलासा दिला. नुकसानभरपाईचा दावा अमान्य करणाऱ्या रेल्वे दावा लवादाच्या ५ सप्टेंबर २०१४च्या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. रेल्वे कायद्यांतर्गत रेल्वे अपघातात झालेला मृत्यू हा दुर्दैवी घटनेचा परिणाम असल्याचे लवादाने मान्य केले असले तरी रेल्वे ओळखपत्र आणि मासिक सीझन तिकिटावरील मृत व्यक्तीच्या नावातील तफावत आणि त्याचे व याचिकाकर्त्यांतील नातेसंबंध सिद्ध करण्यात अपयश आल्याचे नोंदवून लवादाने याचिकाकर्त्यांना भरपाई नाकारली. याचिकेनुसार, मृत व्यक्तीकडे वैध रेल्वे ओळखपत्रासह त्याचे छायाचित्र आणि राधेश्याम सेन नुवाब, असे संपूर्ण नाव नमूद होते. तर मासिक सीझन तिकिटावर नाव संक्षिप्त स्वरूपात ‘राधेश्याम’ असे होते. मासिक सीझन तिकीट मिळवण्यासाठी तिकीट खिडकीवर रेल्वे ओळखपत्र सादर केल्यानंतरच त्या ओळखपत्रातील तपशीलांच्या आधारेच तिकीट तयार केले जाते. या प्रकरणात, तिकिटावर छापलेला ओळखपत्र क्रमांक आणि प्रत्यक्ष ओळखपत्रावरील क्रमांक हे तंतोतंत जुळत होते. यावरून ही दोन्ही कागदपत्रे एकाच व्यक्तीशी संबंधित होती, हे सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देताना स्पष्ट केले.
ठोस कारण दिले नाही
तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्याने ओळखपत्रावरील संपूर्ण नावांपैकी केवळ पहिलेच नाव तिकिटावर नोंदवले त्या कारणास्तव, ज्या व्यक्तीच्या नावे ओळखपत्र देण्यात आले आहे, त्या व्यक्तीलाच मासिक सीझन तिकीट दिले गेले नाही, असे म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांनी सादर केलेली शिधापत्रिका आणि निवडणूक नोंदीसारखी कागदपत्रे तपासण्यात लवादाला अपयश आले. तसेच ती कागदपत्रे फेटाळण्यामागे लवादाने कोणतेही ठोस कारण दिले नसल्याचेही न्यायालयाने शेवटी स्पष्ट केले.

