युद्धजन्य परिस्थितीचा लघु व मध्यम उद्योगावर परिणाम
युद्धजन्य परिस्थितीचा लघू व मध्यम उद्योगांवर परिणाम
उत्पादन खर्च वाढीची शक्यता; चार हजार कंपन्या संकटात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हॉटेल व्यवसायावर होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच जिल्ह्यातील २० टक्के लघू व मध्यम उद्योग क्षेत्रातील कंपन्यांमध्ये एलपीजीचा वापर करण्यात येत असतो. त्यामुळे युद्धाची परिस्थिती अशीच सुरू राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम लघू व मध्यम उद्योग क्षेत्रावर होण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे.
युद्धामुळे इंधन आणि गॅसपुरवठा साखळीवर परिणाम झाला असून, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. याशिवाय शासनाकडून गॅस वापरावरही काही निर्बंध लागू केल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून ही परिस्थिती कायम असल्याने अनेक हॉटेलांना व्यवसाय थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याची वेळ ओढवली आहे. अशातच दुसरीकडे युद्धसदृश परिस्थितीमुळे जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळीवर अनिश्चिततेचे सावट असून, त्याचा परिणाम लघू व मध्यम उद्योग क्षेत्रावर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उद्योग क्षेत्रात वाढत्या खर्चामुळे उत्पादनावर दबाव येण्याची चिन्हे आहेत. गॅसची टंचाई, कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ, इंधनदरातील चढ-उतार तसेच वाहतूक आणि लॉजिस्टिक खर्चात झालेली वाढ यामुळे उद्योगांच्या एकूण उत्पादन खर्चात वाढ होत आहे. याशिवाय निर्यात-आयात प्रक्रियेत होणारा विलंबही उद्योगांसाठी अडथळा ठरत आहे. लघू व मध्यम उद्योग क्षेत्र हे देशाच्या औद्योगिक उत्पादनासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करणारे महत्त्वाचे क्षेत्र मानले जाते. त्यामुळे या क्षेत्रावर होणारा कोणताही परिणाम व्यापक आर्थिक घडामोडींवर परिणाम करू शकतो. सध्याच्या परिस्थितीत उद्योगांना कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा, सुलभ कर्जपुरवठा आणि निर्यात प्रक्रियेत सुसूत्रता मिळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.
आव्हानात्मक परिस्थिती
आव्हानात्मक परिस्थिती असूनही लघू व मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्योगांनी यापूर्वीही विविध संकटांवर मात केली आहे. त्यामुळे या संकटातूनही मार्ग काढत देशाच्या आर्थिक प्रगतीत आपला वाटा कायम ठेवण्याचा विश्वास टिसाचे कार्यकारी सचिव एकनाथ सोनावणे यांनी व्यक्त केला.
ठाणे जिल्ह्यात ३० हजार लघू व मध्यम उद्योग
१. ठाणे जिल्ह्यात जवळपास ३० हजार लघू व मध्यम उद्योग कंपन्या आहेत.
२. त्यापैकी ८० टक्के इंजिनिअरिंग कंपन्या आहेत.
३. चार हजारांच्या आसपास कंपन्यांमध्ये प्रोफाईल कटिंग, प्लेट कटिंग इत्यादीसाठी एलपीजीचा वापर करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लघू व मध्यम उद्योग क्षेत्र हे देशाच्या उत्पादन व रोजगार निर्मितीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत उद्योगांना कच्च्या मालाची उपलब्धता, वित्तीय सहाय्य आणि निर्यात प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आवश्यक ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- भावेश मारू, मानद सचिव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

