‘उमेद’ च्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम - रणजीत यादव

‘उमेद’ च्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम - रणजीत यादव

Published on

‘उमेद’च्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम
मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ग्रामीण भागातील महिलांकडे कौशल्य आणि गुणवत्ता आहे. त्यांना योग्य बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांनी केले. तसेच अशा प्रदर्शनांमुळे त्यांना मोठी चालना मिळत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सरस व मिनी सरस विक्री प्रदर्शनाने यंदा विक्रीचा नवा उच्चांक गाठला. पाच दिवस चाललेल्या या प्रदर्शनात तब्बल ५१ लाख १७ हजार रुपयांची उलाढाल होत महिला बचत गटांच्या कष्टांना मोठे यश मिळाले. वज्रेश्वरी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे आणि राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन १० ते १४ मार्चदरम्यान कल्याण येथील यशवंतराव चव्हाण मैदानात भरविले होते. प्रदर्शनात स्वयंसहाय्यता समूहांच्या महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, हस्तकला, कपडे आणि घरगुती वापराच्या वस्तूंचे १०० स्टॉल उभारले होते. यामध्ये २१० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेत आपल्या उत्पादनांची थेट विक्री केली. सुमारे १२ हजार नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देत मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. यामुळे विक्रीचा आकडा ५१ लाखांच्या पुढे गेला. विशेष म्हणजे अनेक महिला गटांना पुढील व्यावसायिक ऑर्डर मिळाल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

व्यवसायवृद्धीसाठी नवे मार्ग खुले
प्रकल्प संचालक अजिंक्य पवार यांनीही समाधान व्यक्त करीत या प्रदर्शनाने महिला बचत गटांना व्यवसायवृद्धीसाठी नवे मार्ग खुले करून दिल्याचे नमूद केले. भविष्यात अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रदर्शनामुळे महिलांना केवळ विक्रीची संधीच नव्हे, तर ग्राहकांशी थेट संवाद, बाजारपेठेची समज आणि डिजिटल व्यवहारांची ओळख मिळाली. परिणामी महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com