१६ ग्रामपंचायतींमध्ये आर्थिक गैरव्यवहार उघड
मुरबाड, ता. १८ (बातमीदार) : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमध्ये सुमारे एक कोटी ९० लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या चौकशीत ही बाब समोर आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याप्रकरणी संबंधित तत्कालीन ग्रामसेवकांकडून रकमेची वसुली करण्यासाठी मुरबाड पंचायत समितीमार्फत तगादा लावण्यात येत असल्याची माहिती मिळते.
तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींमध्ये गैरव्यवहार झालेल्या रकमेची वसुली करण्यासाठी पंचायत समितीने पाठपुरावा सुरू केला आहे. पऱ्हे ग्रामपंचायतीत स्मशानभूमीच्या कामात झालेल्या सुमारे १० लाख रुपयांच्या अपहाराची रक्कम पंचायत समिती, मुरबाड यांनी वसूल केली आहे. संबंधित तत्कालीन ग्रामपंचायत अधिकाऱ्याने ही रक्कम भरल्यानंतर त्याला पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. इतर ग्रामपंचायतींमधील गैरव्यवहाराची वसुली अद्याप सुरू आहे. संबंधित दोषींवर प्रशासनाने तगादा लावला आहे.
ग्रामपंचायत अपहाराच्या यादीत नढई ग्रामपंचायतीत सुमारे १५.५० लाख रुपयांहून अधिक निधीचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी संतोष आत्माराम भावार्थे आणि तत्कालीन सरपंच कमल दाजी टोहके यांना रक्कम मुदतीत जमा न केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस बजावली होती. नोटीसमधील मुदत उलटून गेल्याने पुढील कारवाई कधी होणार, याबाबत चर्चा रंगत आहे. एकूणच, तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमधील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आल्याने प्रशासनाची जबाबदारी आणि नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ग्रामपंचायतीनिहाय अपहार
डोंगरन्हावे (१,१८,१८१), किशोर (१,६३,८४७), वडवली (८७,९८०), मानीवली (३,५४,२३१), कान्होळ (८९,९२०), सासणे (५,८५,०८१), देहरी (५,२९,३०७), पवाळे (१,०३,०००), उमरोली (खुर्द) (१३,३१,५८६), पऱ्हे (५,१८,९०७ व १३,६३,५८६), करचोंडे (१,१३,४००), वाल्हीवरे (२१,९७,५२७), बळेगाव (२,४६,८१५), वाघिवली (२,४४,५९६), नढई (१५,४४,८३१) आणि कान्हार्ले (२३,४७,९०३) या ग्रामपंचायतींमध्ये एकूण सुमारे १ कोटी ९० लाख एक हजार ३४४ रुपयांचा अपहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

