भिवंडीत एचपीव्ही लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद
भिवंडी, ता. १८ (वार्ताहर) : महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी १४ ते १५ वयोगटातील किशोरवयीन मुलींना दिल्या जाणाऱ्या एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेला भिवंडी शहरात अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे नागरी आरोग्य केंद्र स्तरावर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. वैशाली बारोट यांनी दिली.
८ मार्च ते ८ जून या कालावधीत शहरात विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. एकूण ६,१२० किशोरवयीन मुलींना एचपीव्ही लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र, मोहिमेच्या पहिल्या दहा दिवसांत केवळ ४७ मुलींनीच लस घेतल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. लसीबाबत काही असामाजिक घटकांकडून ‘ही लस सुरक्षित नाही’, ‘लसीमुळे वंधत्व येऊ शकते’ अशा अफवा पसरवल्या जात असल्याने पालक व मुलींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परिणामी, लसीकरणाबाबत अनास्था दिसून येत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या गैरसमजुती दूर करण्यासाठी नागरी आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका व परिचारिका घरोघरी जाऊन किशोरवयीन मुली व त्यांच्या पालकांना लसीबाबत योग्य माहिती देत आहेत. तसेच वैद्यकीय अधिकारी शाळांमध्ये विद्यार्थी व पालकांच्या सभा घेऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून देत आहेत.
अफवा विश्वास नका ठेवू
दरम्यान, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण अत्यंत प्रभावी व सुरक्षित असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता मुलींना लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

