सरपणासाठी महिलांची भटकंती

सरपणासाठी महिलांची भटकंती

Published on

भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. १७ : आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅसटंचाईचा फटका आता शहापूर तालुक्यातील ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांना बसू लागला आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळित झाल्याने महिलांना पुन्हा पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. डोक्यावर सरपणाच्या मोळ्या वाहून नेणारी दृश्ये गावागावांत दिसू लागली आहेत. या गंभीर परिस्थितीकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन गॅस वितरण व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे तालुक्यातील हजारो कुटुंबांचे धूरमुक्त स्वयंपाकघराचे स्वप्न साकार झाले होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने हे चित्र पालटले आहे. सिलिंडर मिळण्यात होणारा विलंब आणि अपुरा पुरवठा यामुळे महिलांना पहाटेपासून जंगलात किंवा मोकळ्या माळरानात जाऊन लाकूडफाटा गोळा करावा लागत आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि कष्टदायक असून महिलांना पहाटेपासून काही किलोमीटर अंतर पायी जावे लागते. रखरखत्या उन्हात डोक्यावर जड मोळ्या वाहून आणल्या जात आहेत. गॅस एजन्सीकडून ‘होम डिलिव्हरी’मध्ये विलंब होत असल्याने ग्राहकांना तासन् तास प्रतीक्षा करावी लागत आहे. मुख्य रस्त्यांवरून गॅस सिलिंडरच्या गाड्या कमी झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. परिणामी लाकडाच्या मोळ्या वाहून नेणाऱ्या महिलांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. सद्यस्थितीत जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून गॅस पुरवठा सुरळीत केल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुन्हा धुराचा त्रास
धूरमुक्त स्वयंपाकघराची सवय झाली होती; मात्र गॅस मिळत नसल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. चुलीवर स्वयंपाक करताना निर्माण होणाऱ्या धुरामुळे डोळे, फुफ्फुसे आणि श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. याच कारणामुळे उज्ज्वला योजनेंतर्गत धूरमुक्त स्वयंपाकघराला प्रोत्साहन देण्यात आले होते. मात्र, आता या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांना पुन्हा धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.


तीन आठवड्यांपासून गॅस तुटवड्यामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी, शहापूर तालुक्यातील अनेक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आली आहे. हॉटेल चालक व कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. कर्ज काढून व्यवसाय सुरू केला असताना गॅस तुटवड्यामुळे हॉटेल बंद ठेवावे लागत आहे. दररोज किमान एक गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
- विजय देशमुख, अध्यक्ष, हॉटेल चालक-मालक संघटना

शहापूर : सरपणाची मोळी डोक्यावरून वाहणाऱ्या ग्रामीण भागातील महिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com