उष्णतेमुळे आंबा उत्पादनाला फटका
उष्णतेमुळे आंबा उत्पादनाला फटका
वाणगाव, ता. १८ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात मागील काही दिवसांत वाढलेल्या उष्णतेमुळे, तापमानामुळे आणि हवामान बदलाचा आंबापिकाला मोठा फटका बसला आहे. प्रचंड उष्णतेमुळे झाडावरील वाटाणा आकाराची लहान फळे, लहान कैऱ्या करपून गळण्याचे प्रमाण वाढले आहे. हवामान बदलामुळे आंब्याच्या बागांची फलधारणा कमी झाली असून, बागायतदार संकटात सापडले आहेत. हवामानात सातत्याने होणारा बदल, तर दुसरीकडे वाढती उष्णता यामुळे यंदाही पालघर जिल्ह्यात आंब्याच्या उत्पादनावर नक्कीच परिणाम होणार असल्याचे गेली २५ वर्षे आंबा उत्पादन घेणारे तलासरी तालुक्यातील बोरीगाव येथील आंबा उत्पादक शेतकरी यज्ञेश सावे यांनी सांगितले आहे.
डिसेंबर-जानेवारीमध्ये थंडीचे प्रमाण समाधानकारक होते. त्यामुळे आंबा बागांमध्ये मोहोर चांगला आला होता. फळधारणाही उत्तमप्रकारे होत असताना दिसत होती; मात्र मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तापमानात झालेल्या झपाट्याच्या वाढीमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली. उष्णतेचा थेट परिणाम नव्याने लागलेल्या फळांवर झाला आहे. परिणामी, यंदाच्या हंगामातील उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंबापिकाला फुलोऱ्याच्या व फळधारणेच्या टप्प्यावर मध्यम तापमानाची आवश्यकता असते; मात्र सतत वाढणाऱ्या उष्णतेमुळे परागीकरणावर परिणाम झाला असून फळधारणा कमी झाली आहे. यंदा उशिरापर्यंत चाललेल्या पावसामुळे आंबा मोहोरावरही विपरीत परिणाम झाला आहे. मोहोर उशिरा आल्याने फळधारणेलाही उशीर झाला आहे. उशीर जरी झाला तरी झाडाला लागलेली फळे टिकवणे सध्याच्या परिस्थितीत कसरतीचे होत आहे. कडक उष्णतेमुळे झाडावरील फळांची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. एकंदरीत यंदा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
----------------
फळगळ रोखण्यासाठी शास्त्रज्ञांच्या उपायोजना
- फळगळ रोखण्यासाठी पूर्ण वाढ झालेल्या आंब्याच्या झाडाला दर १५ दिवसांच्या अंतराने १५० ते २०० लिटर पाणी द्यावे; मात्र फळे काढण्याच्या अगोदर एक महिना आंब्याच्या झाडाला पाणी देणे बंद करावे, जेणेकरून फळांच्या गुणवत्तेवर आणि टिकाऊपणावर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही.
- फळधारणा झालेल्या आंब्याच्या झाडावर दोन टक्के युरिया (२० ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यातून) द्रावणाची फवारणी करावी. त्यामुळे फळगळ कमी होऊन फळांची वाढ चांगली होते.
- फळे गोटीच्या आकाराची झाल्यानंतर २० पीपीएम नेफ्त्यालीन ॲसिटिक ॲसिड (१ ग्रॅम ५० लिटर पाण्यातून) या संजीवकाची फवारणी करावी.
- हापूस आंबा बागांमध्ये परागीकरण व फळधारणा वाढवण्याच्या दृष्टीने केसर, रत्ना, सिंधू किंवा गोवामानकुर यापैकी एका जातीचे १० ते १५ टक्के झाडे लावावीत. त्यामुळे हापूस आंब्यामध्ये फळधारणा वाढवण्यासाठी मदत होते.
फळधारणा झालेल्या आंब्याच्या झाडांना लागलेल्या फळांची मोठ्या प्रमाणात गळ झाली आहे. आंबा बागांप्रमाणे भाजीपाला पिकांचेही उष्णतेमुळे मोठे नुकसान झाले आहे. काही आंब्याच्या झाडांना उशिरा फळधारणा झाल्याने यंदाचा हंगाम जूनपर्यंत लांबण्याचा अंदाज आहे.
- यज्ञेश सावे, आंबा उत्पादक शेतकरी, बोरीगाव, तलासरी
जिल्ह्यात आंबापिकामध्ये फळधारणा झालेली असून फळगळ दिसून येत आहे. सद्यःस्थितीमध्ये ढगाळ वातावरण राहून पाऊस पडल्यास तापमान तसेच आर्द्रतेमध्ये बदल होऊन आंबा फळांचे गळ व आंबापिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
- डॉ. अंकुर ढाणे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, पालघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

