बनावट विदेशी मद्यनिर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त
उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये बनावट विदेशी मद्य तयार करून विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत उघडकीस आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर बनावट मद्य, रिकाम्या बाटल्या आणि विविध ब्रँडचे झाकणे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने उल्हासनगर परिसरात मोठी कारवाई करत भेसळयुक्त बनावट विदेशी मद्य तयार करून विक्री करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकत विजय वासिटा या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, मुंबई; तसेच सहआयुक्त मुंबई आणि अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे २ यांच्या आदेशानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क उल्हासनगर विभागाने ही कारवाई केली. विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ मधील वसिटा कॉलनी येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान वसिटा याच्या ताब्यातून विविध ब्रँडच्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या, बुचे, तसेच बिस्लरीच्या बाटल्यांमध्ये भरलेले भेसळयुक्त बनावट मद्य असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पथकाने केलेल्या तपासात एकूण ९२.५ लिटर भेसळयुक्त बनावट मद्य जप्त केले असून, त्याची अंदाजे किंमत एक लाख २८ हजार ५६५ रुपये इतकी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कारवाईत वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब जाधव, दुय्यम निरीक्षक अविनाश पाटील, सोनाली गावंडे यांच्यासह योगेश राणे, प्रशांत निकुंभ, मयूर तायडे, प्रियांका खरात, शरद भोर आणि मंदार निजापकर यांच्या पथकाने सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक उमेश गायकवाड करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

