विखुरलेल्या चर्मकार समाजाला एकत्र आणण्याचा संकल्प

विखुरलेल्या चर्मकार समाजाला एकत्र आणण्याचा संकल्प

Published on

विखुरलेल्या चर्मकार समाजाला एकत्र आणण्याचा संकल्प
धारावीतील सोहळ्यात एकजुटीवर भर; रखडलेल्या मागण्यांसाठी संघटित लढ्याचा इशारा
धारावी, ता. १८ (बातमीदार) : चांभार, कक्कया (ढोर), मोची, जयस्वार, रेगर, होलार, जाट, अशा विविध जाती, पोटजातीत चर्मकार समाज हा आज विखुरलेला आहे. या समाजाची संघटित शक्ती सरकारला दाखवण्यासाठी आणि चर्मकार समाजाच्या न्याय मागण्यांसाठी बहुभाषिक चर्मकार समाजाची एकजूट घडवून आणण्याचा निर्धार राष्ट्रीय चर्मकार संघाने शनिवारी (ता. १४) आयोजित केलेल्या सोहळ्यात करण्यात आले.
धारावीमधील पद्मभूषण मनोहर जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला. राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्‍या राष्ट्रीय चर्मकार संघाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज, संत कक्कया महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई आणि माता फातिमा शेख यांचा संयुक्त जयंती महोत्सव या वेळी पार पडला. या वेळी सात जणांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांच्या मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला होता. बाबुराव माने यांनी अध्यक्षपदावरून बोलताना समाजाने एकत्र आले पाहिजे, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन केले.
उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटकसह सर्व राज्यांमधील चर्मकार समाजातील सर्व जाती-उपजातींना एका छताखाली आणून त्यांची एकजूट व ताकद ही सरकारला दाखवून देणे आणि या संघटित शक्तीच्या जोरावर चर्मकार समाजाच्या शासन दरबारी अनेक वर्षे रखडलेल्या मागण्या मान्य करून घेणे हा राष्ट्रीय चर्मकार संघाचा उद्देश असल्याचे बाबुराव माने यांनी या वेळी सांगितले. अ‍ॅड. नारायणराव गायकवाड यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. या वेळी नगरसेविका अर्चना शिंदे, प्रजासत्ताक जनता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे, कक्कया समाज महासंघाचे अध्यक्ष निवृत्ती सावळकर, रामभाऊ कदम, परशुराम इंगोले यांच्यासह इतर मान्यवर उपस्‍थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com