केडीएमसीचा निष्कासन कारवाईचा बडगा
मालमत्ता कर थकविल्याने तोडकाम
नेतीवलीतील झोपड्यांवर निष्कासन कारवाई
कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नेतीवली टेकडी परिसरातील दोन खोल्यांवर मंगळवारी महापालिकेने थेट तोडक कारवाई केल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. ‘जे’ प्रभाग क्षेत्राच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. भवानी नगर परिसरातील दोन खोल्यांचा मालमत्ता कर गेल्या अनेक वर्षांपासून थकीत होता. वारंवार सूचना देऊनही कर भरला जात नसल्याने अखेर ही कारवाई करण्यात आली.
लाल बहादूर यादव यांच्या एका खोलीची मालमत्ता कराची एकूण दोन लाख २४ हजार रुपये थकबाकी आहे, तर जे. शेट्टी यांच्या एका खोलीची मालमत्ता कराची एकूण दोन लाख ४० हजार रुपये थकबाकी गेल्या काही वर्षांपासून थकीत आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार, संबंधित खोल्यांवर नोटीस चिकटवून तातडीने निष्कासन (तोडक) कारवाई पूर्ण करण्यात आली. या कारवाईनंतर शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. सरकारी जागेत अनधिकृत बांधकामे करूनही मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर ही कारवाई योग्यच असल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. मात्र, दुसरीकडे केवळ छोट्या थकबाकीदारांवरच हा बडगा का? बड्या धनदांडग्या थकबाकीदारांवर प्रशासन कधी कारवाई करणार? असा सवालही काही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

