पालिका घेणार बोगस डॉक्टरांचा शोध
बोगस डॉक्टर शोधण्यासाठी मोहीम
ठाणे पालिका क्षेत्रात प्रभागनिहाय विशेष पथकांची नियुक्ती
ठाणे, ता. १८ : शहरात परराज्यातून बोगस पदव्या घेऊन प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचे प्रमाण वाढत असल्याचा गंभीर मुद्दा ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित झाला. यावर प्रशासनाने तातडीने दखल घेत प्रभाग समितीनिहाय डॉक्टरांची पथके नेमून सर्व दवाखान्यांची कसून तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारी (ता. १८) पार पडलेल्या सभेत ज्येष्ठ नगरसेवक रमाकांत मढवी यांनी बोगस डॉक्टरांचा प्रश्न लावून धरला. इतर राज्यांतून पदव्या आणून अनेक जण दवाखाने थाटत आहेत आणि नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत, असा आरोप त्यांनी केला. दिवा आणि शहराच्या इतर भागांत अनेक नवीन दवाखाने विनापरवाना सुरू असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी माहिती दिली, की ठाण्यात ११ केंद्रे सुरू असून, २७ मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. सहा पथकांमार्फत यांची तपासणी सुरू आहे. शहरातील २५९ केंद्रांची १० पथकांमार्फत अचानक भेट देऊन तपासणी केली जात आहे. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट लागू नसल्याने डॉक्टरांना पालिकेकडे नोंदणीची सक्ती नसल्याचे सांगताच नगरसेवक आक्रमक झाले. प्रशासनाकडून बोगस डॉक्टरांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
कठोर कारवाईचा इशारा
नगरसेवकांच्या संतापानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी प्रशासनाची बाजू सावरली. त्यांनी जाहीर केले की प्रत्येक प्रभाग समिती स्तरावर डॉक्टरांची पथके नेमली जातील. ही पथके सर्व क्लिनिक्स आणि दवाखान्यांची प्रत्यक्ष पडताळणी करतील. दोषी आढळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कठोर फौजदारी कारवाई केली जाईल आणि त्याचा सविस्तर अहवाल सभागृहासमोर सादर केला जाईल. या आश्वासनानंतर सदस्यांचा विरोध मावळला असून, लवकरच शहरात बोगस डॉक्टरांविरुद्ध मोठी मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

