

मिनी सरस व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री महोत्सव
जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने खाद्यपदार्थांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
अलिबाग, ता. १८ (वार्ताहर) ः महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत महिला स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेकडून भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात रायगड जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी बनवलेली दर्जेदार नावीन्यपूर्ण उत्पादने एकाच छताखाली मिळणार आहेत. या प्रदर्शनाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, खाद्यपदार्थ व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना मिळणार आहे. प्रदर्शनाचे आयोजन २० ते २४ मार्चदरम्यान करण्यात आले आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आयोजित या प्रदर्शनात एकूण १०२ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ८६ बचत गटांनी सहभाग नोंदवला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ‘गवळण आडवाटेची’ आध्यात्मिक यात्रा हा लोकनृत्यावर आधारित कार्यक्रम, मराठी-हिंदी सदाबहार गाण्यांच्या ऑर्केस्ट्रा, महिलांसाठी खेळ पैठणीचा, शेतकरी मेळावा, नाशिकचे सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक हभप रंगनाथ नाईकडे यांचे ग्रामविकास प्रबोधनपर मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहेत. यासोबतच कार्यक्रमासाठी सिनेअभिनेते भाऊ कदम व मराठी अभिनेत्री संजना काळे यांची उपस्थिती लाभणार आहे.
हा प्रदर्शन व विक्री महोत्सव २० ते २४ मार्चदरम्यान अलिबाग समुद्रकिनाऱ्याजवळील मैदानात १० ते रात्री १० वाजेपर्यंत असेल. या महोत्सवासाठी नागरिकांसह पर्यटकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन केले आहे. महिलांनी तयार केलेल्या विविध कलाकृती सर्वांना महोत्सवात उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्याची खाद्यसंस्कृती व सांस्कृतिक संस्कृतीचा आस्वादही घेता येणार आहे. त्यामुळे या महोत्सवाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्या.
- मंगेश वाकडीकर, अध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद
मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवात आपल्याला महिला बचत गटांनी तयार केलेल्या कलाकुसर खाद्यपदार्थ याचा आस्वाद घेता येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महोत्सवाला भेट द्यावी.
- नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.