शिळफाटा रस्ता दुचाकीस्वारांसाठी धोकादायक

शिळफाटा रस्ता दुचाकीस्वारांसाठी धोकादायक

Published on

शिळफाटा रस्ता दुचाकीस्वारांसाठी धोकादायक
सिमेंटच्या चऱ्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच
डोंबिवली, ता. १८ : कल्याण-शिळफाटा मार्गावरील सोनारपाडा येथील क्लासिक हॉटेल ते मानपाडा चौकदरम्यानचा सिमेंट काँक्रीट रस्ता दुचाकीस्वारांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. रस्त्यावर पडलेल्या खोल भेग आणि चऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांत अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या रस्त्याचे काम सुरू असतानाच एका अवजड ट्रकने ओल्या सिमेंटवरून प्रवास केला होता. त्यामुळे चाकांचे खोल ठसे (चरे) रस्त्यावर उमटले. संबंधित ठेकेदाराने हे चरे बुजवून रस्ता समतल करण्याऐवजी तो तसाच सोडून दिला. रात्रीच्या वेळी हे चरे दिसत नसल्याने दुचाकींचे टायर त्यात अडकून चालक ताबा सुटून पडत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत तब्बल चार ते पाच दुचाकीस्वार येथे घसरून पडल्याची माहिती समोर आली आहे.

सोनारपाडा परिसरातील रायडर्स बारसमोरील हा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून मृत्यूचा सापळा बनला आहे. अपघात झाल्यावर दुचाकीस्वार थेट रस्त्याकडेला असलेल्या महावितरणच्या डीपीला जाऊन धडकल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी खासदार कार्यालयाकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र केवळ आश्वासनेच पदरी पडत आहेत. अपघातानंतर मदतीऐवजी वाहनचालकांमध्ये वादावादी आणि हाणामाऱ्यांचे प्रकार घडत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे जोपर्यंत हे चरे बुजवून रस्ता सुरक्षित केला जात नाही तोपर्यंत दुचाकीस्वारांनी या भागातून प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी.

आमदारांकडे साकडे
एखादी मोठी जीवितहानी होण्यापूर्वी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आमदार राजेश मोरे यांनी याप्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून संबंधित यंत्रणेला तत्काळ रस्ता दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी विनंती डोंबिवलीकरांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com