उरण तालुक्यात तीव्र गॅसटंचाई

उरण तालुक्यात तीव्र गॅसटंचाई

Published on

उरण तालुक्यात तीव्र गॅसटंचाई
नागरिक, हॉटेल व्यावसायिक अडचणीत, सिलिंडरसाठी रांगाच रांगा
उरण, ता. १८ (बातमीदार) : आखाती देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला असून, उरण तालुक्यात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई तीव्र होत चालली आहे. या टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल व खाद्यव्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा पुरवठा अनियमित होत असल्याने नागरिकांना पहाटेपासूनच गॅस एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागत आहेत. सिलिंडर मिळवण्यासाठी अनेक जण तासन्‍तास प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. मात्र मागणीच्या तुलनेत सिलिंडर कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
सिलिंडरची गाडी उशिरा येणे किंवा अपुरा पुरवठा यामुळे काही ठिकाणी नागरिकांचा संयम सुटून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचेही प्रकार समोर आले आहेत. घरगुती गॅस सिलिंडर ओटीपी पद्धतीने वितरित केला जात असला तरी त्यातही विलंब होत असल्याच्या तक्रारी आहेत.
दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा अधिक गंभीर बनला आहे. उरणमधील हॉटेल, ढाबे व चायनीज खाद्य व्यावसायिकांना मोठा फटका बसत असून, अनेकांनी व्यवसाय तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गॅसटंचाईमुळे आर्थिक नुकसान वाढत असल्याची व्यावसायिकांची तक्रार आहे.
स्थानिक नागरिक व व्यावसायिकांनी शासन आणि संबंधित गॅसपुरवठा कंपन्यांनी तातडीने उपाययोजना करून नियमित व पुरेसा गॅसपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. येत्या काळात ही समस्या अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात निवासी नायब तहसीलदार महेश पाटील यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद देण्यात आला नाही.
चौकट
आगरी-कोळी बांधवांच्या खाणावळींना फटका
वाशी, ता. १८ (बातमीदार) ः अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्या युद्धातील आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे वाढलेल्या इंधन व गॅस दरांचा थेट परिणाम आता स्थानिक हॉटेल व्यवसायावर दिसू लागला आहे. विशेषतः नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजाच्या पारंपरिक खाणावळींना याचा मोठा फटका बसत असून, मच्छी थाळी, कोळीवाडा स्टाईल पदार्थ, चिकन वडे, मटण थाळी यांसारख्या लोकप्रिय पदार्थांमध्ये कपात करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. वाढत्या खर्चामुळे साधारण २०० ते २५० रुपयांत मिळणाऱ्या थाळींचे दर वाढवणे कठीण झाले आहे.
गॅस आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे स्वयंपाकाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे काही हॉटेल व्यावसायिकांनी ‘रेडी टू ईट’ पदार्थांचा आधार घेत खर्च नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. फिश फ्राय, फिश मसाला, चिकन मसाला यांसारखे पदार्थ अर्धवट तयार स्वरूपात वापरून वेळ आणि खर्च दोन्ही कमी करण्यावर भर दिला जात आहे. मात्र यामुळे पारंपरिक चवीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही पदार्थ कमी करावे लागत आहेत नाहीतर तोटा सहन करावा लागतो, अशी प्रतिक्रिया ऐरोलीतील एका हॉटेल व्यावसायिकाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com