५० लाखांच्या थकबाकीमुळे राजनोवा सिनेमागृह सील!

५० लाखांच्या थकबाकीमुळे राजनोवा सिनेमागृह सील!

Published on

राजनोवा सिनेमागृह सील
५० लाखांची थकबाकी; कर्जत नगर परिषदेची जप्तीची कारवाई

कर्जत, ता. १८ (बातमीदार) ः नगर परिषदेकडून थकबाकीदारांविरोधात कडक पावले उचलण्यात येत असून जप्तीची कारवाई केली जात आहे. यानुसार बुधवारी (ता. १८) शहरातील राजनोवा सिनेमागृहाला टाळे ठोकण्यात आले. तब्बल ५० लाख रुपयांच्या थकबाकीमुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कर्जत नगर परिषदेचे कर निरीक्षक शशांक तळवटकर, सहाय्यक कर निरीक्षक राहुल महाडिक, शीतल सावंत, दीपिका सराई, वसुली लिपिक हृदयनाथ गायकवाड, रूपेश पाटील, रितेश मिसाळ आदींच्या पथकाने कारवाई केली आहे. नगर परिषद कर विभागाने महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमअंतर्गत ही कारवाई केली. संबंधित नोटिसीनुसार, मालमत्ता कर व इतर कर मिळून सुमारे ५३ लाखांची थकबाकी असून, एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीतील देय रक्कम भरलेली नव्हती. वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने अखेर जप्तीची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी इब्सार महाविद्यालयावरसुद्धा कर्जत नगर परिषदेने कारवाई केली होती; मात्र काही थकबाकी भरल्यानंतर ती जप्ती मागे घेत कारवाई थांबवण्यात आली. तसेच दहिवली येथील पशुखाद्याचा कारखानासुद्धा थकबाकीदार असल्याने नगर परिषदेने त्यांच्यावरसुद्धा कारवाई केली आहे. नगर परिषदेकडून मोठ्या थकबाकीदारांवर कारवाईची मोहीम सुरू असून, पुढील काळात अन्य व्यावसायिक आणि निवासी थकबाकीदारांवरही अशीच कडक कारवाई होणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

चित्रपटप्रेमींमध्ये संभ्रम
नगर परिषद पथकाने सिनेमागृहातील बुकिंग कार्यालय बंद करून संपूर्ण थिएटर सील केले. त्यामुळे उद्या प्रदर्शित होणाऱ्या ‘धुरंधर २’ चित्रपटासाठी आगाऊ बुकिंग केलेल्या ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कर्जत शहरातील हे एकमेव सिनेमागृह असल्याने चित्रपटप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com