मालवणीत छतावर दगडफेक; रहिवासी दहशतीत

मालवणीत छतावर दगडफेक; रहिवासी दहशतीत

Published on

मालवणीत छतावर दगडफेक; रहिवासी दहशतीत
मालाड, ता. १९ (बातमीदार) : मालाडमधील मालवणी परिसरातील म्हाडा वसाहतीतील मालवणी विद्यादानी सहकारी गृहनिर्माण सोसायटी येथे अज्ञात व्यक्तीकडून घरांच्या छतावर काचेच्या बाटल्या व विटा फेकण्याच्या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी रहिवाशांनी मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. १८ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजता श्रद्धा मुळीक यांच्या घराच्या छतावर वीट फेकण्यात आली. या घटनेत सिमेंटचे छप्पर तुटून वीट घरात झोपलेल्या २२ वर्षीय तरुणाच्या शेजारी पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापूर्वी १० मार्च रोजी सोसायटीतील सिकंदर मस्तान खान यांच्या घराच्या छतावर काचेची बाटली फेकण्यात आली होती. त्या वेळी छप्पर तुटून घरात काचेचे तुकडे विखुरले. मात्र, यातही कोणी जखमी झाले नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने आयफोन फेकल्याची धक्कादायक घटनादेखील घडली होती. त्या वेळी सोसायटीने लेखी तक्रार देत संबंधित आयफोन पोलिसांच्या ताब्यात दिला होता.
रहिवाशांच्या मते, शेजारील इमारतीतून कोणी तरी खोडसाळपणे हे प्रकार करत आहे. वारंवार तक्रारी करूनही पोलिसांकडून केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com