राज्यातील पाच शहरांना नवी मुंबईचे प्रभावी मार्गदर्शन

राज्यातील पाच शहरांना नवी मुंबईचे प्रभावी मार्गदर्शन

Published on

वाशी, ता. १९ (बातमीदार) : देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहराच्या सुपर स्वच्छ लीगमध्ये नवी मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छ शहर जोडी संकल्पनेमध्ये मार्गदर्शक शहर म्हणून नवी मुंबईकडे कन्नड, जिंतूर, केज या तीन नगर पंचायती आणि लोणार आणि मलकापूर या दोन नगर परिषदांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वच्छ शहर जोडी उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छता अधिकारी यांच्या समूह गटाने नुकतीच या पाचही शहरांना भेटी देत पाहणी केली व स्वच्छताविषयक सुधारणांसाठी मौलिक सूचना केल्या.

यावर्षीपासून स्वच्छ भारत मिशनच्या वतीने ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमांतर्गत देशातील १९६ शहरांना मार्गदर्शन करण्यासाठी एकूण ७२ मार्गदर्शक शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये समाविष्ट नवी मुंबई महापालिका शहराला तीन नगर पंचायती व दोन नगर परिषदा यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्वच्छ शहर जोडीमध्ये स्वच्छतेच्या उत्तम पातळीवर असलेल्या शहराचे मागदर्शन स्वच्छतेबाबत सुधारणेसाठी प्रयत्नशील असणाऱ्या शहरांना मिळावे ही भूमिका असून, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता व्यवस्थापनातील उत्तम पद्धती, सार्वजनिक स्वच्छता व नागरिक सहभाग अशा सर्वच बाबतीत विचारांचे आदान-प्रदान अपेक्षित आहे.

नवी मुंबई महापालिका देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असून, त्यांचे मार्गदर्शन केंद्र सरकारने ठरविलेल्या महाराष्ट्रातील इतर पाच शहरांना मिळावे व या माध्यमातून त्यांच्या शहरातील स्वच्छतेला अधिक गुणवत्ता लाभावी या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे लक्षात घेत महापालिकेने याबाबत पुढाकार घेतला आहे. या पथकांनी त्या पाच शहरांमध्ये जाऊन तेथील स्वच्छता व्यवस्थापनाची पाहणी केली. त्या ठिकाणची कचरा वर्गीकरणाची पद्धत, कचरा संकलनाची पद्धत, कचरा विल्हेवाटीची व्यवस्था, सार्वजनिक शौचालय व्यवस्था, जलस्रोत स्वच्छता अशा विविध बाबींची पाहणी करून त्यामध्ये सुधारणा सुचविल्या.

ऑनलाइन जागृती
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत सिटी प्रोफाइलमध्ये दाखल करावयाच्या ऑनलाइन माहितीच्या पद्धतीचीही माहिती देण्यात आली व त्याविषयीच्या शंकांचे समाधानही करण्यात आले. माहिती प्रचार व प्रसिद्धीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्याबाबत सूचना केल्या.

नागरिकांशी सुसंवाद
या पाहणीमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत क्षेत्रभेटी दिल्या व स्वच्छता कार्याची पाहणी केली. या वेळी त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधतानाच तेथील नागरिकांशीही सुसंवाद साधून स्वच्छतेची स्थिती जाणून घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com