ठाण्यात नववर्षाची भव्य स्वागतयात्रा
ठाण्यात संस्कृती, आधुनिकतेचा संगम
नववर्षाची भव्य स्वागतयात्रा
वंशिका चाचे : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : गुढीपाडव्याच्या निमित्ताने मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी ठाणे शहरात निघालेली पारंपरिक स्वागतयात्रा यंदा अधिक भव्य, अधिक आशयघन ठरली. पहाटेपासूनच शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. घराघरांवर उभारलेल्या गुढ्या, रांगोळ्यांनी सजलेले अंगण आणि पारंपरिक वेशभूषेत सजलेले ठाणेकर यामुळे शहर अक्षरशः सणमय झाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायी स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. त्यामुळे उत्साहात भर पडली.
श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित या यात्रेचे यंदा २६ वे वर्ष असून, ठाण्याच्या सांस्कृतिक ओळखीचा तो एक महत्त्वाचा भाग बनला आहे. ऐतिहासिक कौपिनेश्वर मंदिरातून विधिवत पूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखीचे प्रस्थान झाले आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात यात्रेला सुरुवात झाली. जांभळीनाका येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ही यात्रा तलावपाळी, राम मारुती रोड, चिंतामणी चौक, गोखले रोड मार्गे पुढे सरकली. मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत आणि टाळ्या-घोषणांनी यात्रेचे स्वागत केले.
ढोल-ताशा पथकांचा दणदणाट, लेझीमच्या तालावर थिरकणारे युवक-युवती, तलवारबाजी व मल्लखांब यांसारखी पारंपरिक क्रीडा प्रात्यक्षिके, तसेच आदिवासी नृत्यांच्या सादरीकरणामुळे यात्रेला अस्सल मराठमोळा साज चढला. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांचा सहभाग लक्षवेधी ठरला. यंदाच्या यात्रेत ५८ हून अधिक चित्ररथांनी सामाजिक, ऐतिहासिक आणि राष्ट्रीय विषय मांडले. ‘समर्थ ठाणे सशक्त भारत’, ‘वंदे मातरम्’ १५० वर्षे, ‘भारत २०४७’, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, जलसंवर्धन आणि नागरी कर्तव्ये या विषयांवर आधारित देखणे सादरीकरण केले. डिजिटल इंडिया, स्टार्टअप संस्कृती आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांनाही काही चित्ररथांतून अधोरेखित केले.
बाइक, सायकल रॅली
महिलांची बाइक आणि सायकल रॅली हे यंदाचे प्रमुख आकर्षण ठरले. नऊवारी साडी, फेटा आणि पारंपरिक दागिन्यांनी सजलेल्या महिलांनी आत्मविश्वासपूर्ण सहभाग नोंदवत “संस्कृती आणि सबलीकरण” यांचा सुंदर मिलाफ सादर केला. अनेक स्वयंसेवी संस्थांनी रक्तदान, प्लॅस्टिकमुक्ती, वृक्षलागवड यांसारख्या उपक्रमांचे जनजागरणही या माध्यमातून केले.
शिस्तीचे दर्शन
यंदा यात्रेचे नियोजन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने केले होते. ठाणे महापालिका, वाहतूक पोलिस आणि स्वयंसेवकांनी मिळून वाहतूक नियंत्रण, सुरक्षा आणि स्वच्छतेची प्रभावी व्यवस्था केली होती. आपत्कालीन वैद्यकीय पथकही तैनात होते. मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, आयुक्त सौरभ राव, उपायुक्त संदीप माळवी, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, तसेच न्यासाचे संजीव ब्रह्मे, उत्तम जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तृतीयपंथींचा समान हक्कांसाठी आवाज
यंदा ५५ हून अधिक संस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या स्वागतयात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे समर्थ भारत व्यासपीठाच्या माध्यमातून तृतीयपंथी समाजातील सदस्यांचा सहभाग होता. गुलाबी रिक्षांमधून सहभागी होत त्यांनी आपल्या हक्कांसाठी ठाम भूमिका मांडली. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “आम्हाला सहानुभूती नको, समान हक्क हवेत. भीक मागण्याची वेळ आता संपली असून, आम्हाला रोजगाराच्या संधी द्याव्यात. तसेच त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी देण्याची मागणी केली. तसेच नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या समानतेच्या विचारांची आठवण करून देत प्रत्यक्षात संधी उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली. ‘मंगलमुखी’ अशी नवी ओळख स्वीकारत त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश दिला.
सिने कलाकारांची उपस्थिती
यंदा स्वागतयात्रेत चित्रपटसृष्टीतील कलाकारांचाही सहभाग लक्षवेधी ठरला. विवाह चित्रपटातील अभिनेत्री अमृता राव यांनी नऊवारी साडी नेसून यात्रेत सहभागी होत ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचे कौतुक केले. नागरिकांचा उत्साह, महिलांचा सहभाग आणि परंपरेचे जतन पाहून त्या भारावल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी होण्याचा अनुभव त्यांनी विशेष असल्याचे सांगितले.
मोफत पाण्याचा स्टॉल
गुढीपाडव्याच्या निमित्ताने, ठाणे महापालिकेच्या वतीने जीव्ही एम चॅरिटेबल ट्रस्ट आणि एस ट्रस्ट यांच्या सहकार्याने ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या कोपऱ्यावर मोफत बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची सुविधा सुरू करण्यात आली. उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाचा विचार करून ठाणे महापालिकेतर्फे येत्या काही दिवसांत शहरातील २५ हून अधिक ठिकाणी अशी सुविधा सुरू करण्याचा मानस आहे. या मोफत पाणी स्टॉलचे उद्घाटन ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते, वरिष्ठ नगरसेवक संजय वागुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हे सलग दुसरे वर्ष आहे की जितेंद्र मेहता यांच्या जेव्हीएम ट्रस्टतर्फे ही सेवा दिली जात आहे. ही मोफत पिण्याच्या पाण्याची सेवा जून २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

