ठाण्यात भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव

ठाण्यात भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव

Published on

ठाण्यात भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव
महासभेत नगरसेवकांनी व्यक्त केला संताप ः प्रशासनाकडून ठोस उत्तर नाही
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : ठाणे शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, बुधवारी (ता. १९) झालेल्या महासभेत या मुद्द्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार आवाज उठवला. नागरिकांवर होणारे हल्ले, अपुरे निर्बीजीकरण आणि प्रशासनाची उदासीनता यावरून पालिका प्रशासनाला धारेवर धरत सदस्यांकडून जाब विचारण्यात आला. मात्र, प्रशासनाकडून यावर कुठलेही ठोस उत्तर न मिळाल्याने नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी निर्बीजीकरण मोहिमेत हलगर्जी झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली. दिवा येथील नगरसेविका साक्षी मढवी यांनी भटक्या श्वानांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती सभागृहात दिली, तर नगरसेविका एकता भोईर यांनी वागळे इस्टेट येथील प्राण्यांचा कोंडवारा चार वर्षांपासून बंद असल्याचा मुद्दा मांडला, तर नगरसेवक सुधीर भगत यांनी मुंब्रा भागातील एका घरात २५ ते ३० भटक्या श्वानांना ठेवले जात असल्याने स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची तक्रार केली. विशेष म्हणजे नगरसेविका विमल भोईर यांनी स्वतःच्या नातीला श्वान चावल्यामुळे मोठा वैद्यकीय खर्च करावा लागल्याचा अनुभव मांडला. नगरसेवक राजेश मोरे यांनी कचराळी तलाव परिसरात मांजरांचा वाढता उपद्रवही अधोरेखित केला.

अवयवांची तस्करी
काही जण स्वतःला प्राणीमित्र सांगून रात्रीच्या वेळी भटके श्वान पकडून नेत असल्याचे आरोप करण्यात आले. त्यांच्या अवयवांची तस्करी होत असल्याची शक्यता व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. भटक्या श्वानांच्या गंभीर प्रश्नावर नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. मात्र, यावर प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

श्वान निर्बीजीकरण प्रस्तावावर नगरसेवकांचा आक्षेप
भटक्या श्वानांसाठी एक नसबंदी केंद्र, बाह्य रुग्ण उपचार केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबरच भटके श्वान निर्बीजीकरण मोहिमही राबविण्यात येणार आहे. या संबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र, यातील भटके श्वान निर्बीजीकरण मोहीम प्रस्तावावर नगरसेवकांनी आक्षेप घेत पशुवैद्यकीय अधिकारी क्षमा शिरोडकर यांना जाब विचारला. भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. मात्र, यानंतही श्वान संख्येत वाढ होत असल्याने ही प्रक्रिया बोगस असल्याचा आरोप नगरसेवक संजय भोईर यांनी केला. अनेक लोक भटक्या श्वानांना अन्नपदार्थ खाऊ घालतात. मात्र, त्याच्याबाबत काही नियमावली आहे का, अशी विचारणा करत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com