रेशन देण्याच्या बहाण्याने महिलेला ३ लाखांचा गंडा; ठाण्यातील प्रकार
रेशन देण्याच्या बहाण्याने ३ लाखांचा गंडा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : रेशन देण्याचा बहाणा करून अनोळखी व्यक्तीने एका महिलेची तब्बल तीन लाखांना फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना वागळे इस्टेट परिसरात समोर आली आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लता सावंत (वय ५३) या सोमवारी (ता. १६) आपल्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी जात असताना हिरामोती बिल्डिंगसमोर काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना गाठले. आमचे सेठ लोकांना मोफत रेशन देत आहेत, असे सांगत त्यांनी सावंत यांना जवळच्या गल्लीमध्ये नेले. विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी सावंत यांच्या हातात ५०० रुपयांची नोटही दिली. त्यानंतर सेठला काळ्या मण्यांची ॲलर्जी आहे, असे सांगून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढण्यास भाग पाडले. सावंत यांनी ते दागिने आपल्या पर्समध्ये ठेवले. पुढे आरोपींनी पर्स व चप्पल एका पांढऱ्या पिशवीत ठेवण्यास सांगितले.
काही वेळातच सेठला बोलावून आणतो, असे सांगून आरोपी तेथून पसार झाले. बराच वेळ झाल्यानंतर सावंत यांनी पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये फक्त चप्पल असून पर्स व सुमारे तीन लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र नसल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पतीसह श्रीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

