

नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) : ग्रामीण भागातील महिलांच्या जिद्दीला, कौशल्याला आणि अस्सल पारंपरिक कलेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारे ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन’ यंदा नवी मुंबईच्या दिमतीला सज्ज झाले आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘उमेद’ अभियानांतर्गत आयोजित हे प्रदर्शन वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात २४ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत रंगणार आहे. २४ मार्च रोजी या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
यंदाच्या प्रदर्शनात केवळ खरेदीच नाही, तर अनुभवावरही भर देण्यात आला आहे. व्हिलेज एरियाच्या माध्यमातून समृद्ध पंचायतराजचे दर्शन घडवण्यात येणार आहे. तसेच तंत्रज्ञानाची जोड देत अनामार्फिक वॉल, एआर फोटोग्राफी आणि इन्फोग्राफिक वॉल यांसारख्या आधुनिक संकल्पना राबवण्यात आल्या आहेत. संपूर्ण प्रदर्शन केंद्र वातानुकूलित असून, लहान मुलांसाठी विशेष ‘प्ले एरिया’सुद्धा तयार करण्यात आला आहे. या प्रदर्शनात एकूण ४९० स्टॉल्समध्ये महाराष्ट्रातील २३४, तर इतर राज्यांतील ६६ स्टॉल्सचा समावेश असणार आहे. यात ७० स्टॉल्सचे ‘फूड कोर्ट’ हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे. येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अस्सल शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची चव चाखता येणार आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रदर्शनाच्या पूर्वतयारीसाठी ‘उमेद’ची टीम कार्यरत आहे. ग्रामीण भागातील संस्कृती, कला आणि चव एकाच छताखाली अनुभवण्यासाठी हे प्रदर्शन नागरिक आणि पर्यटकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
शासकीय विभागांचे स्टॉल्स उभारणार
बंजारा व वारली आर्ट, वुडन क्राफ्ट, हातमाग कापड, पारंपरिक आभूषणे आणि लाकडी खेळणी थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. या प्रदर्शनात नाबार्ड, माविम, खादी ग्रामोद्योग आणि कृषी विभागासह विविध १८ शासकीय विभागांचे स्टॉल्सही ठेवण्यात आले आहेत.
नवी मुंबईतील प्रदर्शनाचे हे सलग तिसरे वर्ष असून, यंदाचे स्वरूप अधिक व्यापक आहे. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या ‘उमेद’ अभियानामुळे आज लाखो महिला कुशल उद्योजिका बनल्या आहेत. त्यांच्या उत्पादनांना थेट शहरी बाजारपेठ मिळवून देणे, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण महिलांच्या कष्टाला आणि त्यांच्या उद्योगाला बळ देण्यासाठी नवी मुंबईकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.
नीलेश सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, उमेद अभियान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.