शेकडो व्यापाऱ्यांवर कडक कारवाई होणार

शेकडो व्यापाऱ्यांवर कडक कारवाई होणार

Published on

तुर्भे, ता. १९ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ आणि भाजी बाजारामध्ये नियमांचे उल्लंघन करून व्यापार करणाऱ्या २०० हून अधिक व्यापाऱ्यांचे पंचनामे प्राप्त झाले आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव शरद जरे यांनी दिली आहे. बाजार समितीच्या ४० वर्षांच्या इतिहासात अद्यापपर्यंत धडक कारवाई करण्याचे धाडस कोणी केले नव्हते. यामुळे बाजार समितीच्या पाचही बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे.

भाजी आणि फळ बाजार मुंबईहून वाशी येथे स्थलांतरित झाल्यानंतर काही वर्षे जुन्या व्यापाऱ्यांनी योग्य प्रकारे व्यापार केला; मात्र २००० नंतर या व्यापाऱ्यांची पुढील पिढी व्यापारामध्ये म्हणावी तशी उतरली नाही. परिणामी शेकडो व्यापाऱ्यांनी त्यांचे गाळे भाड्याने दिले आहेत. फळ आणि भाजी बाजारामधील एका गाळ्याला महिन्याला सुमारे ८० हजार ते सव्वा लाख रुपये भाडे प्रत्येक व्यापाऱ्याला मिळत आहे. बाजार समितीच्या उपविधीनुसार अशा प्रकारे पोटभाडे करून ठेवणे ही नियमांची उल्लंघन करणारी बाब आहे. यावर अधिक कहर म्हणजे मराठी माणसाच्या हातामध्ये मार्केट राहिले नाही, अशी ओरड करणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांनीच शेतमाल विक्री करण्याचा कोणताही बाजार समितीचा परवाना नसताना लोकांना बेकायदा गाळे भाड्याने दिल्याचे अनेक पंचनाम्यामध्ये उघड झाले आहे. त्यामुळे नुकतेच फळ बाजारामध्ये दोन गाळे सील करण्यात आले आहेत.

भाजीपाला आणि फळ बाजारामध्ये गाळ्यांव्यतिरिक्त पॅसेज, गाळ्याशेजारील मोकळी जागा या ठिकाणी मालाची विक्री केली जाते. यामध्ये गाळाधारक व्यापारी त्यांच्या अनुज्ञाप्तीवर माल मागवून तो चवली दलालाकडे विक्रीसाठी देतात. त्यांच्याकडे बाजार समितीची अनुज्ञाप्ती नसते, तरीही तो हा माल पॅसेज किंवा गाळ्याशेजारील मोकळी जागेत कायद्याची पळवाट काढून विक्री करीत आहे. यामध्ये हा चवलीदलाल या व्यापाऱ्याकडे कामाला असल्याचे कागदपत्री दाखवत असल्याने त्याच्यावर ठोस कारवाई केली जात नाही; मात्र त्याच्याकडून महिन्याला ८० ते ९५ हजार रुपये गाळामालक भाडे घेत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दोन्ही बाजारांमध्ये गाळ्यांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी मालविक्री करणाऱ्यांचे फावले आहे. अशाप्रकारे अनधिकृतपणे पॅसेजमध्ये बसून मालाची विक्री करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे.

तक्रारींची दखल
परिणामी पॅसेज किंवा गाळ्याशेजारून नीट चालायलाही जागा नसते. त्यामुळे ग्राहक, माथाडी कामगार तसेच अन्य घटकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत प्रभू पाटील आणि शरद जरे यांनी धडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार काही महिन्यांपासून धडक मोहीम राबवून बाजारामध्ये शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

व्यापाऱ्यांना नोटीस
या कारवाईमध्ये गाळ्यांच्या बाहेर सामासिक जागा (कॉमन पॅसेज) तसेच धक्क्यावर ट्रक, टेम्पो यामध्ये मालाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, या कारवाईला भीक न घालणाऱ्या व्यापाऱ्यांचे जागेवर पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. पंचनाम्यानुसार संबंधित व्यापाऱ्यांना नोटीस बजावून खुलासे मागवले जाणार आहेत. हे खुलासे समाधानकारक न वाटल्यास प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहे.

परवाना निलंबित करण्याची शक्यता
बाजार समितीचे सभापती प्रभू पाटील यांनी या कारवाईचे समर्थन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भविष्यात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये परवाना निलंबित करण्यापासून गाळा ताब्यात घेण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com