पुस्तकांची गुढी उभारून वाचन संस्कृतीचा संदेश
पुस्तकांची गुढी उभारून वाचन संस्कृतीचा संदेश
मालाड, ता. १९ (बातमीदार) : वाचन संस्कृती जोपासण्यासाठी भाकर फाउंडेशन सेंटर, भगतसिंग नगर क्र. २, गोरेगाव (पश्चिम), मुंबई येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पुस्तकांची गुढी उभारण्यात आली.
गुढीपाडवा हा नवचैतन्य, विजय आणि नव्या सुरुवातींचा सण मानला जातो. पारंपरिक गुढी ही समृद्धी, संस्कृती आणि यशाचे प्रतीक असते. याच संकल्पनेला आधुनिक स्वरूप देत भाकर फाउंडेशनने ‘पुस्तकांची गुढी’ उभारून ज्ञानाचा सन्मान करण्याचा संदेश दिला. आजच्या युगात पुस्तकं हीच खरी ज्ञानाची गुढी असून, समाजाला दिशा देणारी शक्ती आहे, असे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमातून समाजात वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञान व विचारांची देवाणघेवाण वाढावी आणि नव्या पिढीत संस्कारक्षम व सुजाण नागरिक घडावेत, हा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. याप्रसंगी भाकर फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक सोनावणे, शकुंतला वाघचौरे, अजय भालेराव, मानसी आचरेकर, कस्तुरी शाहू तसेच बालसभेचे सदस्य उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करीत प्रत्येकाने पुस्तके वाचण्याची सवय लावावी, असे आवाहन केले.

