एसटी प्रवाशांना मिळाला निवारा
एसटी प्रवाशांना मिळाला निवारा
ठाणे स्थानक आगाराचा कायापालट; ऊन-पावसापासून मिळणार दिलासा
ठाणे शहर, ता. १९ (बातमीदार) : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एसटी आगारात प्रवाशांची होणारी वणवण आता थांबणार आहे. अत्यंत धोकादायक अवस्थेत असलेल्या या आगाराच्या इमारतीची दुरुस्ती करून प्रवाशांसाठी भव्य संरक्षक शेड उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ‘सकाळ’ने या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवल्यानंतर एसटी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
ठाणे स्थानकासमोरील एसटी आगाराची इमारत महापालिकेने ‘धोकादायक’ घोषित केली होती. स्लॅब कोसळण्याच्या भीतीमुळे कर्मचारी आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. प्रशासनाने आता या इमारतीचा वरचा मजला हटवून बांधकामावरील भार कमी केला आहे. तसेच भिंतींमधील भेगा भरून आणि प्लास्टर करून इमारतीला मजबुती दिली आहे.
आगारात भिवंडी, पालघर, जव्हार, वाडा आणि तलासरी यांसारख्या दुर्गम भागांतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या प्रवाशांना बसण्यासाठी हक्काची जागा नव्हती. आता बांधण्यात येत असलेल्या पत्र्याच्या भव्य शेडमुळे ऊन आणि पावसापासून संरक्षण मिळणार आहे. प्रवाशांना आता तासन्तास उन्हात उभे राहावे लागणार नाही.
सुसज्ज आसनव्यवस्था
शेडसोबतच प्रवाशांसाठी इतर प्राथमिक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. इमारत धोकादायक असल्याने अनेक अधिकारी आणि कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत होते. आता इमारतीची दुरुस्ती झाल्यामुळे आगारातील कामकाज अधिक सुरक्षित वातावरणात पार पडणार आहे.
‘सकाळ’ची भूमिका
आगाराची जर्जर अवस्था आणि प्रवाशांचे हाल याबाबत ‘सकाळ’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

