पनवेलमधील आणखी दोन अनधिकृत शाळांवर गुन्हे

पनवेलमधील आणखी दोन अनधिकृत शाळांवर गुन्हे

Published on

पनवेल, ता. १९ (वार्ताहर) : तालुक्यात विनापरवाना आणि अनधिकृतपणे शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या संस्थाचालकांविरोधात शिक्षण विभाग आणि पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जानेवारीमध्ये पाच अनधिकृत शाळांवर केलेल्या धडक कारवाईनंतर आता पुन्हा दोन नामांकित शाळांच्या संस्थाचालक व मुख्याध्यापकांवर पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे बेकायदा शाळा चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईत वावंजे येथील सनराईज इंग्लिश स्कूल आणि खारपाडा येथील नवजीवन इंटरनॅशनल स्कूल या शाळांचा समावेश आहे. गटशिक्षणाधिकारी शाहू सतपाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या शाळांकडे शासकीय मान्यता नव्हती तसेच त्यांच्याकडे यूडीआयएसई क्रमांकदेखील नव्हता. त्यानंतरदेखील या दोन्ही शाळा सुरू होत्या. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी सनराईज इंग्लिश स्कूलचे संस्थापक इरफान शेख व मुख्याध्यापक मारिया दारुवाले तसेच साई गणेश एज्युकेशन सोसायटीच्या नवजीवन इंटरनॅशनल स्कूल संस्थाचालक, अध्यक्ष, मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अनधिकृत शाळांचे जाळे खोलवर
पनवेल तालुक्यात अनधिकृत शाळांविरुद्धची ही पहिलीच कारवाई नाही. यापूर्वी जानेवारीमध्येही शिक्षण विभागाने अशाच प्रकारे कठोर पावले उचलत पाच शाळांवर गुन्हे दाखल केले होते. एकाच शैक्षणिक वर्षात सातत्याने होणाऱ्या या कारवाईमुळे पनवेलमध्ये अनधिकृत शाळांचे जाळे किती खोलवर पसरले आहे, हे उघड झाले आहे.

मोठ्या दंडाची तरतूद
जानेवारीतील पाच शाळांनंतरही धडा न घेणाऱ्या संस्थाचालकांवर आता ही नवीन कारवाई करण्यात आली आहे. या शाळांनी सरकारची कोणतीही परवानगी न घेता पालकांना भूलथापा देऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले होते. आरटीई कायद्यानुसार प्रतिदिन १० हजार रुपये दंड आणि मोठी दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com