गुडीपाडव्याच्या शोभायात्रांतून संस्कृतीचा जागर

गुडीपाडव्याच्या शोभायात्रांतून संस्कृतीचा जागर

Published on

वाशी, ता. १९ (बातमीदार) : चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवी मुंबई शहरात गुरुवारी (ता. १९) ठिकठिकाणी भव्य शोभायात्रा, पालखी मिरवणुका आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत शहरभर जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

ढोल-ताशा, टाळ-मृदंगाच्या निनादात, तसेच ध्वजपथक, लेझीम पथकांच्या तालावर निघालेल्या शोभायात्रांनी शहर दुमदुमून गेले. या मिरवणुकांमधून सामाजिक एकात्मता, पर्यावरण संवर्धन, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध, नेत्रदान व रक्तदान यांसारखे महत्त्वाचे संदेश प्रभावीपणे देण्यात आले. शहरातील विविध सोसायट्यांमध्ये आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पारंपरिक फेटे परिधान करून तरुणाईपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. महिलांनी मराठमोळी नऊवारी साडी नेसून दुचाकींवरून मिरवणुकीत सहभागी होत सणाची शोभा वाढवली. घणसोली येथे सौरभ ऋषिंकात शिंदे फाउंडेशनच्या वतीने हिंदू नववर्ष शोभायात्रा आणि वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आशापुरा चौक ते अश्राम रोड दरम्यान काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी पारंपरिक वेशभूषा साकारत सहभाग घेतला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी स्पर्धाही घेण्यात आल्या, ज्यामुळे शोभायात्रेला अनोखी रंगत प्राप्त झाली.

ऐरोलीमध्ये ‘आपला कट्टा’ सामाजिक संस्थेच्या वतीने सेक्टर १० येथील सिद्धिविनायक मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या यात्रेचे वैशिष्ट्य ठरले. नेत्रदान व रक्तदानाबाबत जनजागृती करत विविध सामाजिक संदेश देण्यात आले. सेक्टर ८ मधील तुळजा भवानी मंदिराजवळ या शोभायात्रेची सांगता झाली.

सामाजिक संदेश
या शोभायात्रांमध्ये स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, पोलिओमुक्त भारत अशा सामाजिक विषयांवर घोषणाबाजी करण्यात आली. ढोल पथकांनी नवी मुंबई अक्षरशः दणाणून सोडली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या नागरिकांनी सेल्फी घेत उत्सवाचा आनंद लुटला. नवी मुंबईत गुडीपाडव्याचा सण केवळ उत्साहातच नव्हे, तर संस्कृतीचे जतन आणि सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com