पनवेल मध्ये जल्लोषपूर्ण शोभायात्रा

पनवेल मध्ये जल्लोषपूर्ण शोभायात्रा

Published on

पनवेलमध्ये जल्लोषपूर्ण शोभायात्रा
‘वंदे मातरम्’ १५० वर्षे थीमने रंगला नववर्ष स्वागत सोहळा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १९ : पनवेल शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघालेल्या शोभायात्रेत यंदा उत्साह, ऊर्जा आणि सांस्कृतिक वैभवाचा महासागर उसळला. मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करीत संपूर्ण शहर भगव्या रंगात न्हाऊन निघाले होते. नववर्ष स्वागत समिती, पनवेल यांच्या वतीने आयोजित या शोभायात्रेने भव्यतेचा नवा उच्चांक गाठला.
या दिमाखदार शोभायात्रेला शहरातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथून उत्साहात सुरुवात झाली. त्यानंतर ही मिरवणूक कर्मवीर भाऊराव पाटील चौक, टपाल नाका, शनी मंदिर, महात्मा गांधी मार्ग, मिरची गल्ली, कापड बाजार, जय भारत नाका आणि लोकमान्य टिळक मार्ग या प्रमुख मार्गांवरून जल्लोषात मार्गक्रमण करीत स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे समारोप झाला.
टिळक रोड, यशोमंगल नाका आणि सावरकर चौक परिसरात नववर्ष स्वागत समिती पनवेल आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे केलेली आकर्षक सजावट, रोषणाई आणि भगव्या पताकांनी सजलेले रस्ते पाहताना डोळ्यांचे पारणे फिटत होते. ढोल-ताशांचा कडकडाट, लेझीमचा थरारक ताल, पारंपरिक वेशभूषेत सजलेले युवक-युवती आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी वातावरण अक्षरशः दणाणून गेले.
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या १५० वर्षांच्या गौरवाची मुख्य संकल्पना ही यंदाच्या शोभायात्रेचे सर्वात मोठे आकर्षण ठरली. देशभक्तीने भारलेले चित्ररथ, जिवंत देखावे आणि प्रभावी सादरीकरणांनी उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. स्वातंत्र्य, संस्कृती आणि राष्ट्रीय अभिमान यांचा संगम या मिरवणुकीत ठळकपणे अनुभवायला मिळाला.
परिसरातील तब्बल १४ संस्थांचे आकर्षक चित्ररथ या शोभायात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येक चित्ररथाने आपल्या कलात्मकतेने आणि संदेशाने प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच युवानाद ट्रस्टतर्फे ध्वज-लेझीम-ढोल पथकात सुमारे १५० मुलांनी सहभाग घेतला.
या दिमाखदार सोहळ्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, युवानेते प्रीतम म्हात्रे, ज्येष्ठ नेते जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, नगरसेवक अजय बहिरा, राजू सोनी, सुमित झुंजारराव, नगरसेविका रुचिता लोंढे, प्रीती जॉर्ज, शिवानी घरत, अभिषेक पटवर्धन, केदार भगत, अमित ओझे, रुपेश नागवेकर, माधुरी गोसावी यांच्यासह नगरसेवक आणि विविध पक्षांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्साह, परंपरा, संस्कृती आणि देशभक्तीचा संगम साधणारी पनवेलची ही शोभायात्रा भव्य, दिव्य आणि अविस्मरणीय ठरली आणि नववर्षाच्या स्वागताला या शोभायात्रेने खऱ्या अर्थाने ऐतिहासिक उंचीवर नेऊन ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com