अंगणात पुन्हा चिमण्यांचा किलबिलाट

अंगणात पुन्हा चिमण्यांचा किलबिलाट

Published on

अंगणात पुन्हा चिमण्यांचा किलबिलाट
चिमणी दिवसानिमित्ताने जनजागृती; चिमण्यांचा वावर वाढला
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १९ : एकेकाळी घराच्या अंगणात, छपरावर आणि खिडकीत सहज दिसणारी चिमणी मध्यंतरीच्या कालावधीत मात्र दिसेनाशी झाली होती. या छोट्याशा पक्ष्याच्या संवर्धनासाठी सातत्याने झालेल्या प्रयत्नांनी चिमण्यांचा किलबिलाट पुन्हा जाणवू लागला आहे. जागतिक चिमणी दिवसानिमित्त शुक्रवारी (ता. २०) रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी चिमणी संवर्धनाबाबत जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे कमी होत चाललेल्या चिमण्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संस्थांकडून करण्यात आले.
जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, महाड आणि रोहा परिसरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘चिमणी वाचवा’ मोहीम राबविण्यात आली. काही स्वयंसेवी संस्थांनी नागरिकांना मोफत कृत्रिम घरटी (नेस्ट बॉक्स), पाणी-खाद्यपदार्थांची भांडी वितरित करून घरांच्या गॅलरी व अंगणात ती बसवण्याचे मार्गदर्शन केले. जिल्ह्यात ज्याप्रमाणे गिधाड संवर्धनाला जसे यश येत आहे, तसेच काही प्रमाणात चिमणी वाचवा या मोहिमेलाही यश येत आहे. पर्यावरण अभ्यासकांच्या मते, वाढते काँक्रीटीकरण, झाडांची घटती संख्या, कीटकनाशकांचा वाढलेला वापर आणि बदलती जीवनशैली यामुळे चिमण्यांना नैसर्गिक अधिवास मिळणे कठीण झाले आहे. पूर्वी घराच्या कौलांमध्ये आणि मोकळ्या जागांमध्ये सहज दिसणारी चिमणी आता दुर्मिळ होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पाण्याची भांडी ठेवणे, धान्य उपलब्ध करून देणे, झाडे लावणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

कोट
चिमणी ही केवळ पक्षी नसून पर्यावरणाच्या आरोग्याची सूचक मानली जाते. ती कीटक नियंत्रणात मदत करते आणि जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे चिमणी वाचवणे म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणास हातभार लावणारे आहे. कीटकनाशकाची फवारणी, मोबाईल येण्यापूर्वी चिमण्यांचा वावर सहज दिसत असे. अनेकांच्या या लहानशा पक्ष्याबद्दल भावनिक आठवणी आहेत. या पक्ष्याचे अस्तित्व कायम रहावे यासाठी झालेल्या जनजागृतीमुळे चिमण्या पुन्हा दिसू लागल्या आहेत.
-अमित निंबाळकर, पर्यावरण अभ्यासक

चौकट-
चिमणी दिवसाचे महत्त्व
सध्या देशभरातील चिमण्यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील अनेक जाती तर इतिहासजमा झाल्या आहेत. ‘पासर डोमेस्टीकस’ अर्थातच ‘हाउस स्पॅरो’ ही चिमण्यांची जात सर्व जगभरात आहे. जगभरात २६ जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. मात्र, या २६ पैकी फक्त २३ चिमण्यांची छायाचित्रे सध्या उपलब्ध आहेत. चिमण्या लुप्त होण्यामुळे पर्यावरणापुढे अनेक धोके उभे राहिले आहेत. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरातील तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव झाली आहे अन् यातूनच २०१० पासून २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातोय.

चिमण्यांना वाचविण्यासाठीचे उपाय
- उन्हाचा दाह वाढल्याने या पक्ष्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी घरात किंवा अंगणात पाण्याची व्यवस्था करावी.
- एखादे मातीचे भांडे पक्ष्यांना पाणी पिणे पिणे शक्य होईल अशा ठिकाणी ठेवावे.
- पक्ष्यांसाठी कमीत कमी १० फूट उंचीवर लाकडाचे किंवा कपट्याचे कृत्रिम घरटे तयार करावे.
- पक्ष्यांना लागणारे धान्य दररोज त्यांना उपलब्ध होईल अशा पद्धतीने टाकणे. उरलेले अन्न पक्ष्यांना टाकणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com