पहिल्यादांच विद्यार्थ्यांना मिळणार दोन सीईटी परीक्षेचे दोन हॉलतिकीट

पहिल्यादांच विद्यार्थ्यांना मिळणार दोन सीईटी परीक्षेचे दोन हॉलतिकीट

Published on

सीईटीसाठी यंदा दोन प्रवेशपत्रे
परीक्षा २४ मार्च ते १६ मे या कालावधीत

मुंबई, ता. १९ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठीच्या पदवी पूर्व आणि पदव्युत्तर १७ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा २४ मार्च ते १६ मे या कालावधीत घेण्यात येत आहेत. या वर्षी प्रथमच सीईटी कक्ष विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेची एक अस्थायी व एक अंतिम अशी दोन प्रवेशपत्रे उमेदवारांना उपलब्ध करून देणार आहे.
सीईटी कक्षाने प्रवेश परीक्षांचे अंतिम परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. यानंतर त्या त्या प्रवेश परीक्षेच्या ८ ते १० दिवस आधी अस्थायी प्रवेशपत्र विद्यार्थ्याच्या लॉग-इनमध्ये ऑनलाइन उपलब्ध होतील. या अस्थायी प्रवेशपत्रामध्ये विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेसाठी कोणता जिल्हा व कोणते शहर आले आहे, हे समजू शकेल. विद्यार्थी परीक्षा केंद्र भरताना पसंतीक्रमानुसार त्याला चार जिल्हे भरावे लागतात. यानुसार या अस्थायी प्रवेशपत्रात विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र कोणत्या शहरात व कोणत्या जिल्ह्यात आहे, यासंबंधीची माहिती उपलब्ध होईल. विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेच्या तीन ते चार दिवस आधी अंतिम प्रवेशपत्र त्याच्या लॉग-इनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. या अंतिम प्रवेशपत्रात प्रत्यक्ष परीक्षा केंद्र, परीक्षा केंद्राचा कोड, परीक्षा केंद्राचे नाव व पत्ता याची माहिती दिली जाईल. सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हा आणि तालुक्यासह त्यांच्या परीक्षा केंद्राच्या तपशिलाची पडताळणी करणे आवश्यक आहे आणि त्यांचे अंतिम प्रवेशपत्र डाउनलोड करणे आवश्यक आहे. सीईटीच्या परीक्षेसंबंधी अद्ययावत माहिती आणि पुढील सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.
...
विद्यार्थ्याच्या लॉग-इनमध्ये...
सध्या एमपीएड, एमएड व एमएचएमसीटीचे या तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेची अस्थायी प्रवेशपत्रे विद्यार्थ्याच्या लॉग-इनमध्ये ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहेत. यातील एमपीएड या अभ्यासक्रमाची परीक्षा मंगळवार, २४ मार्चपासून सुरू होत आहे. एमएड या अभ्यासक्रमाची परीक्षा बुधवार, २५ मार्चपासून सुरू होत आहे. एमएचएमसीटी या अभ्यासक्रमाची परीक्षा बुधवार, २५ मार्चपासून सुरू होत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com