महाराष्ट्रधर्मासाठी मराठी जनांना एकत्र यावे; डॉ. दीपक पवार यांचे अवाहन
महाराष्ट्र धर्मासाठी एकत्र यावे
डॉ. दीपक पवार यांचे मराठी माणसांना अवाहन
मुंबई, ता. १९ : कट्टर हिंदुत्व किंवा इतर कोणत्याही धार्मिकतेपेक्षा मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी शाळा आणि गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळणे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन डॉ. दीपक पवार यांनी केले. गुढीपाडव्याचे औचित्य साधून मराठी अभ्यास केंद्र आयोजित मराठी नववर्ष स्वागतयात्रा मुंबई येथे नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि मोठ्या उत्साहात गुरुवारी (ता. १९) पार पडली. या वेळी ते बोलत होते.
डॉ. पवार यांनी महाराष्ट्रातील स्थलांतराच्या वाढत्या प्रश्नावर भाष्य केले. ही यात्रा दादर येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन येथून सुरू होऊन मीनाताई ठाकरे पुतळा, शिवसेना भवन, शिवाजी मंदिर, हिंदमाता मार्गे परळ येथील कामगार मैदान येथे पोहोचली. यात्रेमध्ये मराठी शाळा, हुतात्मे तसेच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील शिलेदारांबाबत माहिती देणाऱ्या प्रमुख चित्ररथाचा समावेश होता.
डाॅ. पवार म्हणाले, ‘महाराष्ट्राबाहेरून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोंढ्यांमुळे स्थानिकांच्या रोजगार, नोकरी आणि व्यवसायांवर परिणाम होत आहे. राज्याच्या अर्थकारणावरही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळेच मराठी नववर्ष स्वागतयात्रा काढण्याची गरज निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. हा दिवस केवळ हिंदू नववर्ष म्हणून साजरा करण्याऐवजी मराठीकारण आणि महाराष्ट्रधर्म जपण्याचा संकल्प करण्याचा आहे.’
यात्रेची सुरुवात महाराष्ट्र गीत, मुंबईची लावणी गाऊन आणि संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशात रांगोळीचे रंग भरून करण्यात आली. या वेळी महेंद्र डोंगरे यांनी लिहिलेली नाटिका सादर करण्यात आली.
...तरच भाषा टिकेल
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, ‘मराठी भाषेचा अभिमान आहेच; पण माजही आहे. पाडव्याच्या निमित्ताने आपण आपल्या मुलांना मराठी शाळेत प्रवेश देण्याचा निश्चय करू या. मराठी शाळा टिकल्या तरच भाषा टिकेल. मराठी माणूस आणि भाषेसाठी आपण कायम सोबत राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. चिन्मयी सुमीत म्हणाल्या, ‘मराठी असणं जन्माने ठरत नाही, तर ते बाण्याने ठरते. आपला मराठी बाणा जपला पाहिजे. तर प्राजक्ता हनमघर यांनी, खूप दिवसांनी पाडवा खऱ्या अर्थाने साजरा करत आहे, अशी भावना व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

