विस्तारित ठाणे स्थानकाला ‘आनंद दिघे’ नाव
विस्तारित ठाणे स्थानकाला ‘आनंद दिघे’ नाव
पालिकेच्या महासभेत ठराव मंजूर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : ठाणे-मुलुंडदरम्यान उभारण्यात येणाऱ्या नव्या रेल्वे स्थानकाला आनंद दिघे यांचे नाव देण्यास ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. यासंदर्भातील अभिनंदनाचा ठरावही बुधवारी मंजूर करण्यात आला.
मध्य रेल्वेकडून वाढत्या प्रवासीसंख्येच्या पार्श्वभूमीवर नव्या स्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च रेल्वेकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सुरुवातीला महापालिका आणि रेल्वे यांच्यात खर्च वाटपाचा प्रस्ताव होता; मात्र विलंबामुळे वाढलेल्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा भार रेल्वेने उचलावा, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांनी पाठपुरावा केला होता. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही यास मान्यता दिली. दरम्यान, खासदार नरेश मस्के यांनी संसदेमध्ये या नवीन विस्तारित स्थानकाला आनंद दिघे नाव देण्याची मागणी केली. या मागणीला बळकटी देणारा ठराव बुधवारी झालेल्या महासभेत करण्यात आला.
शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी ठाणे शहरासाठी मोठे योगदान दिले आहे. त्याचे स्मरण भावी पिढीला कायम राहावे, यासाठी आनंद दिघे यांच्या नावाने स्थानकाचे नामकरण करण्यात यावे, अशी ठाणेकरांची इच्छा आहे. त्यामुळे पालिकेच्या महासभेत यासंदर्भात ठराव करण्यात आला आहे.

