वाशी हायवेवर १७ लाखांचा गांजा जप्त,

वाशी हायवेवर १७ लाखांचा गांजा जप्त,

Published on

वाशी हायवेवर १७ लाखांचा गांजा जप्त
एका अल्पवयीन मुलासह मुद्देमाल ताब्यात, मुख्य आरोपी फरार

नवी मुंबई, ता. २० (वार्ताहर) : सायन-पनवेल महामार्गावर वाशी येथे अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांपैकी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी १० किलो १३० ग्रॅम वजनाचा गांजा तसेच कार असा सुमारे १७.९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या वेळी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेल्या २२ वर्षीय मुख्य आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
गुरुवारी (ता. १९) रात्री वाशी पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथक सायन-पनवेल महामार्गावर मुंबई लेनवर गस्त घालत होते. या वेळी वाशी प्लाझा ब्रिज उतरल्यानंतर एक कार संशयास्पदरीत्या उभी असल्याचे पोलिसांच्या दिसली. पोलिस गाडीजवळ पोहोचताच चालकाच्या बाजूला बसलेला २२ वर्षीय तरुण पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेऊन पळाला. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवत गाडीतील १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले. या वेळी पोलिसांनी कारची झडती घेतली असता, त्यात एका जांभळ्या रंगाच्या बॅगेत खाकी टेपने गुंडाळलेली १० पाकिटे आढळली. या पाकिटांमध्ये तीव्र वासाचा १०.१३० किलो गांजा सापडला. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळून गेलेला आरोपी अक्षय याला पकडण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलिस उपआयुक्त पंकज डहाणे, सहा. पोलिस आयुक्त आदीनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जहाँगिर मुलाणी, पोलिस उप निरीक्षक सांगळे व त्यांच्या पथकाने केली.

Marathi News Esakal
www.esakal.com