

धारावी स्कायवॉकसाठी म्हाडाला फोडणी
पालिकेला ७५ लाख द्यावे लागणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : म्हाडाने आठ वर्षांपूर्वी धारावीत स्कायवॉक उभारला असून, त्याचे पालिकेकडे लवकरच हस्तांतरण केले जाणार आहे. हस्तांतरण करण्याआधीच स्ट्रक्चरल ऑडिटपोटी म्हाडाला तब्बल ७५ लाख रुपयांची फोडणी बसणार आहे. म्हाडाकडून रक्कम देण्याची तयारी सुरू असली तरी त्याबाबत काहीशी नाराजी आहे.
धारावी या दाटीवाटीच्या झोपडपट्टीतून माहीम स्थानकापर्यंत जाण्यासाठी नागरिकांना रस्त्याने चालताना मोठी कसरत करावी लागते. त्या पार्श्वभूमीवर धारावीत मजबूत स्कायवाॅक उभारला जावा म्हणून एमएमआरडीएने तब्बल ३० कोटी रुपयांचा निधी म्हाडाला दिला होता. त्यानुसार म्हाडाने २०१६ मध्ये या स्कायवाॅकचे काम दोन टप्प्यात पूर्ण केले होते. त्यामुळे धारावीतील अभ्युदय बँक ते माहीम स्थानक यादरम्यान ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, म्हाडाकडे स्कायवाॅकसारख्या स्ट्रक्चरची देखभाल किंवा दुरुस्ती करण्यासाठी वेगळा निधी नसल्याने म्हाडाने तो पालिकेला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतची प्रक्रिया म्हाडाने सुरू केली आहे. स्कायवॉक ताब्यात देण्यापूर्वी म्हाडाने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी अट पालिकेने घातली होती. मात्र, म्हाडाकडे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने पालिकेने हस्तांतरण करून घेऊन मग स्ट्रक्चरल ऑडिट करावे, असे म्हाडाने स्पष्ट केले होते. म्हाडाने स्ट्रक्चरल ऑडिट आणि अन्य बाबींसाठी ७५ लाख रुपये दिले तरच ताबा घेऊ, अशी भूमिका पालिकेने घेतली होती. त्यामुळे म्हाडाने इच्छा नसतानाही ही रक्कम देण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.