‘एन’ विभागात नालेसफाई मोहीम सुरू

‘एन’ विभागात नालेसफाई मोहीम सुरू

Published on

‘एन’ विभागात नालेसफाई मोहीम सुरू
पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी पालिकेची तयारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० ः महापौर रितू तावडे यांच्या घाटकोपर विभागात नालेसफाईची कामे जोरात सुरू आहेत. या भागातील मोठे नाले आणि अंतर्गत नाले याची सफाई कामे केली जाणार आहेत. सध्या मोठ्या नाल्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. घाटकोपर भागातील १४ नाल्यांची पावसाळ्यापूर्वी शंभर टक्के नालेसफाई करण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे.
पावसाळ्यापूर्वीच्या कामांना वेग आला असून, घाटकोपरच्या ‘एन’ विभागातील नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांना कंत्राटदारांनी सुरुवात केली आहे. सफाई कामांचा शुभारंभ नुकताच महापौर रितू तावडे यांच्या हस्ते सोमय्या नाल्यावर करण्यात आला. पावसाळ्यात पाणी साचू नये, निचरा जलद व्हावा, यासाठी पालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू केली आहेत.
पालिकेची यंत्रणा त्यासाठी कामाला जुंपली आहे. महापौर रितू तावडे यांच्यामुळे घाटकोपर विभागात सर्व विभागांच्या आधी नालेसफाईला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाल्यास घाटकोपर भागातील नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास स्थानिक व्यक्त करीत आहेत.

२२ हजार मेट्रिक टन उपसण्याचे उद्दिष्ट
पालिकेच्या एन विभागात एकूण १४ नाल्यांची स्वच्छता केली जाणार असून, या नाल्यांची एकत्रित लांबी १५,८८५ मीटर आहे. सोमय्या नाला आणि लक्ष्मीबाग नाला यांसारख्या प्रमुख नाल्यांचा यामध्ये समावेश आहे. यंदा एकूण २२,५११ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com