मच्छिमारांवर युद्धामुळे संकट

मच्छिमारांवर युद्धामुळे संकट

Published on

मच्छीमारांवर युद्धामुळे संकट
डिझेलच्या दरात प्रति लिटर २२ रुपयांची वाढ
विरार/भाईंदर, ता. २१(बातमीदार)ः इराण-इस्राईल संघर्षामुळे बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांनी डिझेल दरात प्रचंड वाढ केली असून, महाराष्ट्रातील मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याची भीती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने व्यक्त केली आहे.
पेट्रोलपंपावर किरकोळ डिझेलचा दर ९०.०३ रुपये प्रति लिटर असताना, मच्छीमार सहकारी संस्थांसाठी ११२ रुपये आकारले जात आहेत. मच्छीमार सहकारी संस्थांना तांत्रिकदृष्ट्या ‘बल्क कन्झ्युमर’ म्हणून वर्गीकृत केल्यामुळे प्रति लिटर २२ रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहेत. प्राथमिक क्षेत्रावर लादलेला हा कर अन्यायकारक असून, अशहरातील आलिशान गाड्या वापरणाऱ्यांना ९० रुपयांनी डिझेल मिळते. मात्र, देशाला अन्नसुरक्षा देणाऱ्या कष्टकरी मच्छीमाराला सहकारी संस्थेतून ११२ रुपये दराने डिझेल खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे हा कर महाराष्ट्रातील ३.६ लाख मच्छीमारांच्या पोटावर केलेला आघात असल्याचे समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर थंड यांनी सांगितले.
-----------------------
संघटनेने नोंदवलेले आक्षेप
- रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळी अशीच परिस्थिती ओढवली होती. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मच्छीमार, शेतकऱ्यांसाठी तिसरा प्रवर्ग तयार करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर कायमस्वरूपी निर्णय झाला नसल्याने मच्छीमारांवर ही वेळ आली आहे.
- सरकारने २२ रुपयांची तफावत तातडीने दूर केली नाही, तर मासळीच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा इंधनाचा खर्च जास्त होत असल्याने मच्छीमार समुद्रामध्ये जाऊच शकणार नाहीत, असा इशारा कृती समितीचे उपाध्यक्ष प्रदीप टपके यांनी दिला आहे.
ः-------------------------------------------
दुष्काळाशी सामना
मासेमारीसाठी लागणारे डिझेल मच्छीमारांच्या सहकारी संस्थांना देण्यात येते. या डिझेलवर सबसिडी म्हणून सरककारडून परतावा दिला जातो. मात्र, हा परतावा कधीही वेळेवर मिळत नाही, त्यासाठी तीन ते चार वर्षांची वाट बघावी लागते. त्यामुळे डिझेलसाठी मच्छीमारांना पदरचे पैसे मोजावे लागतात. अशातच गेल्या काही वर्षांपासून समुद्रात मासळीच्या दुष्काळ आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कर्जाचे हफ्ते, मासेमारीसाठी डिझेलसह नौकेवरील कर्मचाऱ्यांचे पगार यांचा मेळ घालताना मच्छीमार मेटाकुटीला आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com