उल्हासनगरमध्ये कोट्यवधींचा टीडीआर घोटाळा
उल्हासनगर, ता. २३ (वार्ताहर) : उल्हासनगरमधील बहुचर्चित टीडीआर घोटाळ्याने आता राज्य पातळीवर खळबळ उडवली आहे. प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या दालनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. माजी मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत टीडीआर व्यवहारांवर तत्काळ स्थगिती, लेखापरीक्षण आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे स्पष्ट संकेत दिल्याने प्रशासनात मोठी हालचाल सुरू झाली आहे.
उल्हासनगरमधील टीडीआर घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारने गंभीर भूमिका घेत निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रधान सचिव गुप्ता यांच्या दालनात माजी मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता शहरातील सर्व टीडीआर व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. सुरुवातीला टीडीआर क्रमांक १४, १७ आणि १८ या प्रकरणांचे लेखापरीक्षण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात आले. या बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील, शैलेश तिवारी आणि शरद पोळके यांचीही उपस्थिती होती.
तिन्ही टीडीआर व्यवहारांचे मूळ दस्तऐवज ताब्यात घेऊन लेखापरीक्षण पूर्ण होईपर्यंत टीडीआर खरेदी-विक्री पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, टीडीआर खरेदी करणाऱ्या विकसकांची फसवणूक झाल्यास त्यांनी संबंधित विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत आणि नवीन टीडीआर खरेदी करूनच बांधकाम प्रक्रियेत समावेश करावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. या प्रकरणात तत्कालीन एडीटीपी ललित खोब्रागडे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. टीडीआर व सुधारित बांधकाम परवानग्यांमध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेत नियमबाह्य पद्धतीने सुमारे १७ कोटी रुपयांचे आरसीसी प्रमाणपत्र देण्यात आल्याची बाबही बैठकीत समोर आली. एकूणच, टीडीआर क्रमांक १४, १७ आणि १८ या प्रकरणांत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे सरकारने मान्य केले आहे.
संपूर्ण माहिती संकेतस्थळावर
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर उल्हासनगरमध्ये टीडीआरची संपूर्ण माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील १० दिवसांत ही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
उल्हासनगरकरांच्या हक्कासाठी हा लढा शेवटपर्यंत लढलो. आज त्या लढ्याला यश मिळाल्याचे समाधान आहे. टीडीआर घोटाळा उघडकीस आणताना आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, दबाव टाकण्यात आला; पण आम्ही मागे हटलो नाही. सरकारने या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. ही सत्याच्या विजयाची सुरुवात आहे. या घोटाळ्यातील प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. उल्हासनगरमध्ये पारदर्शक आणि न्याय्य विकास व्हावा, हीच भूमिका असून जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी पुढेही लढत राहू.
- ॲड. स्वप्नील पाटील, ठाणे जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

